साटेली भेडशीत वडापाव विक्री करणाऱ्या तरुणाने घेतला गळफास

तालुक्यात खळबळ आणि हळहळही
Edited by:
Published on: January 28, 2026 15:06 PM
views 309  views

दोडामार्ग : गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी मधला बाजार येथे वडापाव चहा विक्री करणाऱ्या झरे - काजुळ, धनगरवाडी, येथील रहिवासी असलेल्या दिपक विठ्ठल खरवत (वय- ३५) या तरूणाने सासोली भरपाल सीमेवर तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याच्या ठिकाणी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याच्या हातांच्या वडापावची विशेष चव अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असताना ती चव आता पुन्हा चाखता येणार नाही. हक्काचा वडापावं वाला, अचानक गेल्याने हळहळही व्यक्त होतं आहे. वडा पाव  स्टॉलवरील व्यवसाय सुरळीत चालू होता मग त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले? असा सवाल उपस्थित होत आहे.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे पंचनामा करून मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यानंतर नातेवाईक यांच्या खरवत यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. 

दिपक विठ्ठल खरवत हा युवक साटेली भेडशी येथे शामुचा वडापाव नावाने सर्वदूर परिचित असलेला काकाचा वडापाव, चहा विक्री स्टाॅल चालवत होता. त्याला युवा वर्गाची पहिली पसंदी असायची शिवाय नेहमीच चांगली गर्दी असायची. ग्राहक रांगेत थांबून त्यांचेकडील वडापावचा आस्वाद घेत होते. शिवाय तेथील कॉलेज व हायस्कुल समोरच हा वडापाव चा स्टॉल असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठीही ते सोयीचे होते. 

दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार दिपक आपल्या एका कौटुंबिक केस संदर्भात मंगळवारी जिल्हा न्यायालयात गेला होता. या नंतर त्याच्या गाडीला अपघात होऊन त्याला किरकोळ मार बसला होता. याची माहिती त्याने घरी कळविली त्यानंतर नातेवाईकही तेथे गेले होते. यावेळी आपण येतो तुम्ही चला असे सांगत तो मागेच राहिला.. 

मात्र, मंगळवारी सायंकाळ पर्यंत तो घरी आला नसल्याने फोन केला असता त्याचा फोन बंद येऊ लागला. नातेवाईक व मिञ सातत्याने फोन करत होते पण राञी उशिरा पर्यंत त्याचा फोन बंद होता. राञी उशिरा फोन चालू झाला. अनेक मेसेज केले पण त्याने फोन घेतलेला नाही. सकाळी शोधाशोध केली असता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याने गळफास लावून आत्महत्या केली.  उजेडासाठी त्याने मोबाईल बॅटरीचा उपयोग करत झाडाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे  पुढे आले आहे.