
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संगीत मित्रमंडळातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य व संगीत क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये साहित्य मैत्र पुरस्कार फोंडाघाट येथील ज्येष्ठ लेखक संजय तांबे यांना त्यांच्या ‘समाजभान’ या वैचारिक ग्रंथासाठी, तर संगीत मैत्र पुरस्कार कुडाळ येथील गायक-वादक श्याम तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असून, ३१ जानेवारी रोजी कणकवली येथील मराठा नाट्यगृहात होणाऱ्या दुसऱ्या साहित्य संगीत संमेलनात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या पुरस्कार विजेत्यांची निवड ज्येष्ठ कवी अजय कांडर व संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या वर्षापासून सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्रमंडळातर्फे साहित्य व संगीत क्षेत्रातील गुणवंत कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी साहित्य संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत दरवर्षी साहित्य मैत्र व संगीत मैत्र पुरस्कार प्रदान केले जातात. संजय तांबे हे कोकणातील ज्येष्ठ लेखक-कवी असून गेली चार दशके ते सातत्याने लेखन करत आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून ‘समाजभान’ या ग्रंथात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक व स्त्रीमुक्ती विषयांवर सशक्त वैचारिक मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक पळवेकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.
संगीत मैत्र पुरस्कार प्राप्त श्याम तेंडोलकर हे कुडाळ येथील लोकप्रिय संगीत कलावंत असून शास्त्रीय संगीत, ख्याल गायन तसेच तबला व हार्मोनियम वादनात त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांनी आग्रा घराण्याचे राजन माडये व बाळ आंबर्डेकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले असून संगीत विशारद ही पदवी संपादन केली आहे. दूरदर्शनवरही त्यांचे कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचे सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.










