
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज भरण्याचा कालावधी सुरू असून कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघासाठी मंगळवारी दिवसभरात चार अर्ज दाखल झाले. यातील तीन अर्ज जिल्हा परिषदेसाठी तर एक अर्ज पंचायत समितीसाठी दाखल झाला आहे. दरम्यान बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत कणकवली तालुक्यात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तर मंगळवारी दिवसभरात चार अर्ज दाखल झाले. यामध्ये कलमठ जि. प. मतदार संघातून उबाठा शिवसेनेतर्फे वैदेही विलास गुडेकर यांनी दोन अर्ज दाखल केले. फोंडाघाट जि. प. मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनंत गंगाराम पिळणकर यांनी अर्ज दाखल केला. तर हरकुळ बुद्रुक पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या सायली संजय तोरसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
बुधवारी उसळणार गर्दी
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार, २१ जानेवारी हा अंतिम दिवस आहे. कणकवली तालुक्यात जि.प.चे आठ तर पं.स. चे सोळा मतदारसंघ आहेत. सहाजिकच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळणार आहे.










