
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समिती च्या जागांसाठी आज २० जानेवारी पर्यंत केवळ उमेदवारी २ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी आज भारतीय जनता पार्टी तर्फे आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या २१ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.
वेंगुर्ले तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे प्रथम मनीष दळवी यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मच्छिमार नेते वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, भाजपचे पदाधिकारी प्रशांत प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते.
दरम्यान दुसरा उमेदवारी अर्ज चंद्रहास उमेश पांडजी - रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ यांनी अपक्ष म्हणून दाखल केला आहे. तर आजपर्यँत एकूण १६२ उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत, उद्या बुधवारी दुपारी ३ वाजे पर्यंत येणारे उमेदवारी अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. त्या नंतर कुणाचाही उमेदवारी अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.










