
सावंतवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका रंगात आल्या असून सावंतवाडी तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा असून आज जि.प.साठी ५ तर पं.स. साठी ८ असे १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
आतापर्यंत पंचायत समितीसाठी १५२ तर जिल्हा परिषदसाठी ९३ उमेदवारी अर्ज इच्छुकांकडून घेतले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी समीर घारे, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांच्याकडे आज १५ अर्ज दाखल झालेत. तालुक्यात माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, मळेवाड, आरोंदा, बांदा हे जिल्हा परिषद मतदारसंघ असून पंचायत समितीला १८ मतदारसंघ आहेत. यात माखडोल, कलंबिस्त, आंबोली, विलवडे, कोलगाव, कारिवडे, तळवडे, मळगाव, माजगाव, चराठे, इन्सुली, शेर्ले, मळेवाड, न्हावेली, आरोंदा, सातार्डा, बांदा, तांबोळी मतदारसंघाचा समावेश आहे.
आज कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले मायकल डिसोझा यांनी अर्ज दाखल केलेत. एकाच मतदारसंघातून भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांनी अर्ज भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री, स्व. भाईसाहेब सावंत, माजी सभापती विकास सावंत यांचा मोठा वारसा त्यांना आहे. तसेच माडखोल सौ. सुप्रिया मडगावकर,मळेवाडमधून प्रियांका नारोजी यांचे अर्ज आलेत. पंचायत समिती सदस्य पदासाठी कलंबिस्त चंद्रकांत राणे, प्रशांत देसाई, न्हावेली मोहन पालेकर, रमेश निर्गुण, आंबोली अच्युत गावडे, मायकल डिसोझा, कोलगाव गौरी धुरी, माजगाव संजय कानसे यांनी अर्ज दाखल केले आहेत.










