
कणकवली : कणकवली शहरात टेबवाडी येथे सुपर बाजारच्या मागील शेतात काल सायंकाळी ५ जनावरांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एक जनावर मृत अवस्थेत सकाळी त्याच परिसरात सापडून आलं. नेमका मृत्यू कसा झाला हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. मृत जनावरांमध्ये दोन दुधाळ, एक रेडा ,एक गाभण ,एक गाय आणि एक पाडी असे एकूण सहा जनावरे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मृत झालेल्या जनावरांमुळे शेतकरी राकेश अशोक राणे राहणार फौजदारवाडी यांचे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या मृत जनावरांना पाहून शेतकरी राकेश अशोक राणे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला
घटनेची माहिती मिळताच, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पीडित शेतकरी राकेश राणे यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे, नगरसेविका आर्या राणे, मेघा सावंत, महेश सावंत, बंडू हर्णे,सुजीत जाधव, बाळू पारकर यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. आज या जनावरांच्या शवविच्छेदनानंतर नेमका या ६ जनावरांचा मृत्यू कसा झाला हे उघड होणार आहे.











