
सावंतवाडी : बहुप्रतिक्षित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका रंगात आल्या असून माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यात जि.प.साठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप ११ तर शिवसेनला ६ तर पंचायत समितीत १७-१७ जागांचा फॉर्म्युला त्यांनी जाहीर केला आहे.
सावंतवाडी तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. यात जि.प. मतदारसंघात ९ पैकी ३ जागा शिवसेना तर ६ भाजपला जाण्याची शक्यता आहे. पंचायत समितीत ५०-५० च्या फॉर्म्युल्याचा विचार होऊ शकतो. तालुक्यातील माडखोल, आंबोली, कोलगाव, तळवडे, माजगाव, इन्सुली, मळेवाड, आरोंदा, बांदा हे जिल्हा परिषद मतदारसंघ असून यातील आंबोली, इन्सुली अन् आरोंदा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तसेच पंचायत समितीला १८ मतदारसंघ असून माखडोल, कलंबिस्त, आंबोली, विलवडे, कोलगाव, कारिवडे, तळवडे, मळगाव, माजगाव, चराठे, इन्सुली, शेर्ले, मळेवाड, न्हावेली, आरोंदा, सातार्डा, बांदा, तांबोळी मतदारसंघाचा समावेश आहे. ९-९ अशा जागा दोन्ही पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या अधिक असून संधी कुणाला मिळते हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. बंडखोरीची मनधरणी करण्यात पक्षनेतृत्वाचा कसं लागणार असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जाणार आहेत.










