
कणकवली : कणकवलीत लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने ' लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ' या कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे करण्यात आले आहे, या खाऊ गल्ली कार्यक्रमात 1 हजार मुलांना 50रुपयांचे कुपन विविध स्टॉलवर खरेदीसाठी मोफत दिले जाणार आहे. स्थानिकांना फुड स्टॉल लावण्यासाठी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. आलेल्या लहान मुलांना चॉकलेट वाटण्यात येतील , त्यामध्ये बक्षीस असतील व मुलांसोबत आलेल्या पालकांसाठी मराठी,हिंदी गाण्यांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा असेल. या खाऊ गल्ली कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होईल, अशी माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे , जावेद शेख,बाळा सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले, कणकवली शहरातील नागरिकांनी माझ्या राजकीय जीवनात कायमची साथ दिलेली आहे. या नगरपंचायत निवडणूकीत 5 हजार 96 मते मला मिळालेली आहेत. तसेच माझ्या पत्नीला सर्वात जास्त मताधिक्यांनी याच कणकवलीतील जनतेने निवडून दिले आहे. ज्यांनी मला मतदान केलं नसेल ती देखील कणकवली शहरातील माझी माणसे आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कणकवली शहरातील लहान मुलांसाठी घेत असलेला कार्यक्रम खाऊ गल्ली व्हावा , अशी अपेक्षा पालक व मुलांची होती. तसे मला व माझ्या पत्नीला मुलांचे व शिक्षकांचे फोन येत होते. त्यामुळे कणकवलीकरांच्या प्रेमाखातर मी खाऊ गल्ली कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. जरी पदावर नसलो तरी माझी बांधिलकी कणकवलीकरांशी आहे. त्यादृष्टीने माझ्या मित्रमंडळाच्यावतीने तेवढ्याच ताकतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे , असे समीर नलावडे यांनी सांगितले.
गणपती साना येथे शनिवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होईल. या सोबत लहान मुलांसाठी विविध फनी गेम्सची रेलचेलही असणार आहे. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रम स्थळी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स लावू इच्छिणाऱ्यांना मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. स्टॉलसाठी पहिल्यांदा येणा-या लोकांना प्राधान्य असेल. खाऊ गल्लीत लहान मुलांसाठी जादूगार मनोरंजन करणार आहेत. लहान मुलांना टॅटू काढण्यासाठी गोव्यातील 2 कलाकार असणार आहे. खाऊ गल्लीचे उद्धाटन लहान मुलांना चॉकलेट वाटप करुन करण्यात येईल. 2 सेल्फी पॉईंट आलेल्या लोकांसाठी असतील. त्यामुळे या खाऊ गल्लीत पालकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
एक दिवस बच्चे कंपनीसाठी !
लहान मुलांनी आपल्या पालकांसमवेत या खाऊ गल्लीत यावे आणि मौज मजा करावी. आनंद लुटावा अशी या कार्यक्रम आयोजना मागची माझी भूमिका आहे. त्या भूमिकेला मित्र मंडळींनी पाठींबा दिला असून त्यातूनच एक दिवस बच्चे कंपनीसाठी अशी संकल्पना घेऊन हा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत आहोत.पालकांनी व शहरातील नागरिकांनी मनात कुठलेही किंतू परंतु न ठेवता सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.
माझा पक्ष खा. नारायण राणेच, त्यांना सोडून कुठेही जाणार नाही : समीर नलावडे
स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय पक्ष घेईल. अधिकृत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्फत स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाचा निर्णय होणार आहे. जे पक्षाचे आदेश येतील तशी नावे जाहिर केली जातील. आमचे 9 नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर विरोधकांचे 8 नगरसेवक असून नगराध्यक्षांना कास्टींग वोटचा अधिकार मिळाल्यास त्यांचा उपनगराध्यक्ष होईल. परंतु याबाबत अधिकृत माझ्याकडे माहिती नाही. मला आवडलेले स्टेटस मी नेहमी ठेवत असतो. त्यामुळे त्याचे चांगले संकेत समजून स्विकारावेत. कणकवलीतील मेळाव्याच्या वेळी मी माझ्या रुटींग चेकअपसाठी गोव्याला होतो. माझे नेते खा. नारायण राणे आहेत. माझा पक्ष नारायण राणे आहे. त्यामुळे खा. नारायण राणे , मंत्री नितेश राणे यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.










