
कणकवली : वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने रंगभूमीच्या चार पिढया घडविल्या आहेत. नाट्य क्षेत्रातील नवोदितांना घडविण्याचे काम आचेरकर प्रतिष्ठान करीत आहे. महानगरांमध्ये असलेले सांस्कृतिक प्रदूषण सिंधुदुर्गासह कणकवलीत नाही. नाथ पै यांच्या स्मृतिनिमित्त आचेरकर प्रतिष्ठान गेली ४७ वर्षे एकांकिका स्पर्धा आयोजित करीत आहे. ही स्पर्धा शालेय व खुला गटात होते. अशाप्रकाराची ही राज्यातील बहुधा पहिली स्पर्धा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, स्पर्धेचे परीक्षक तुषार भद्रे यांनी केले.
वसंतराव आचेरकर प्रतिष्ठानच्या ४८ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात झाले. या प्रसंगी श्री. भद्रे बोलत होते. यावेळी स्पर्धेचे अन्य परीक्षक एसएनडीसीच्या मराठी विभागप्रमुख, कवयित्री, अभिनेत्री, अनुवादक डॉ. प्रिया जामकर, विविध चार भाषांमध्ये रंगभूमीवर काम करणारे अभिनेते प्रदीप वेंगुर्लेकर, प्रतिष्ठानचे कार्यवाह अॅड. एन.आर. देसाई, उद्योजक सुनील पाटील, विश्वस्त दामोदर खानोलकर, सीमा कोरगावकर,लीना काळसेकर,राजा राजाध्यक्ष,टिकू कांबळी,सिद्धेश खटावकर,अमोल खानोलकर, याच्यासह शहरातील नाट्यरसिक व स्पर्धक उपस्थित होते.
श्री. भद्रे म्हणाले, नाथ पै एकांकिका स्पर्धेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने रंगभूमीच्या चार पिढ्या घडविल्या आहेत. त्यातीलच मी पण एक आहे. या स्पर्धेत १९७९ ते ८४ मध्ये मला अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. ते आजही मी जपून ठेवलंय. इथे आल्यावर एक उर्जा मिळते. ही उर्जा इतर ठिकाणी काम करताना उपयोगी पडते, असे भद्रे यांनी सांगितले.
भद्रे म्हणाले, लहान मोठ्या गटांत अशी एकांकिका स्पर्धा कुठेच होत नाही. मी साताºयामध्ये मोठ्या थिएटरसाठी प्रयत्न केले. त्यानंतर तेथील अनेक कलाकार आज मालिका, चित्रपटांमध्ये काम करीत आहेत. मात्र, येथे प्रदूषण नाहीय, वातावरणातही नाही आणि सांस्कृतिकही प्रदूषण नाही. इथला भवताल फार छान आहे. हा भवताल घडवावा लागतो. तो नाही घडवला तर काहीच होणार नाही. पडदा उघडताच आपण तेथील वातावरणात जातो. पन्नासाव्या वर्षाकडे वाटचाल करणाºया या स्पधेर्चे काम फार मोठे आहे. हे इतकी वर्षे करणे सोपी गोष्ट नाही.
शरद सावंत म्हणाले, यावर्षी शालेय गटाला मोठा प्रतिसाद मिळाला. पन्नासावी नाथ पै एकांकिका स्पर्धा भव्य करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेसाठी कोणताही शासनाचा अचवा राजकीय वरदहस्त मिळत नाही. मात्र, रसिकांच्या व आश्रयदात्यांच्या मदतीवर आम्ही ही चळवळ सुरू ठेवली आहे, असे सांगितले.२३ तरीख पासून शालेय व खुला गटाच्या सुरु झालेल्या या एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ रोजी रात्रौ वसंतराव आचेरकर प्रतिष्ठान येथे होणार आहे.










