
कणकवली : डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युतीचा नाहक बळी गेला आहे. त्या डॉक्टरवर कारवाई करा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे. परिणामी त्या खाजगी रुग्णालयातील वातावरण आता रविवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तंग बनले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका १९ वर्षीय युवतीच्या डोक्याला गाठ आली होती. तिला शुक्रवारी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढूया असे सांगितले. त्यानुसार युवतीवर त्याच खासगी रुग्णालयात सायंकाळी ५ वा. सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने युवतीला अखेर कोल्हापूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटेच्या सुमारास युवतीचा मृत्यू झाला.
याबाबत संतप्त ग्रामस्थांनी युवतीच्या मृतदेहासह सदर खासगी रुग्णालय गाठले. त्या डॉक्टरने कोणत्याही चाचण्या न करता गाठ काढली. त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनीही सदर खाजगी रुग्णालय गाठले आहे. पोलीस ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत ते खाजगी रुग्णालय व परिसरातील वातावरण काहीस तंग बनले आहे.










