
कणकवली : सत्ताधारी भाजपाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी कणकवली शहर विकास आघाडी करून बांधलेली मोट आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे याच शहर विकास आघाडीचे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊनही राज्यात कुठेच न पटणाऱ्या शिंदे शिवसेनेने केलेली अनोखी युती, यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली आहे.
नितेश राणे यांची 'भाजपा विरोधात सारे' अशीच निवडणूक कणकवलीत होत असताना, अनेक प्रकारचे चक्रव्यू विरोधक रचत असताना या साऱ्या चक्रव्यूहांना भेदण्यासाठी भाजपचे चणाक्ष पालकमंत्री नितेश राणे यांनी साऱ्या टीका टिपण्यांना केराची टोपली दाखवत विकासकामांचा झंजावत हाच अजेंडा घेऊन जनतेला विकासासाठी साथ देण्याचे केलेले आवाहन विरोधकांना कमालीचे डोईजड होऊ लागलेआहे. इतकेच नव्हे तर झालेल्या दर्जेदार विकास कामांच्या जोरावर कणकवलीत भाजप पक्ष निवडणुकीला सामोरा जात असून त्याला मतदारांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. सत्ता बदलामुळे नितेश राणे यांना देखील स्थानिक आमदार म्हणून कणकवली साठी लागेल तो निधी खेचून आणण्याची संधी उपलब्ध झाली. याच जोरावर नितेश राणे यांचे शिलेदार व कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह कणकवली नगरपंचायतीतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी मोठा फायदा करून घेतला. याच दरम्यान नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला. मात्र कणकवलीचे आमदार नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. आणि प्रशासकीय काळात स्थानिक लोकप्रतिनिधी यांची कमतरता त्यांनी भरून काढली. २ वर्ष प्रशासकीय कारभार असतानाही समीर नलावडे व त्यांची टीम कणकवली करांच्या सेवेत कार्यरत राहिली. साहजिकचं कणकवली शहर विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, याची दक्षता घेतली. परिणामी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीत प्रशासक असतानाही दहा ते पंधरा कोटींचा निधी प्राप्त झाला. या निधीतून अनेक कामे प्रस्तावित असून ती आचारसंहितेनंतर सुरू होणार आहेत. हेच सतत्यपूर्ण काम, आणि विकास कामाचा मुद्दा घेऊन भाजप पक्ष, त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत.
...अशी घडत गेली विकास कामे
कणकवली नगरपंचायतवर सत्ता प्रस्तापित केल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम रिंगरोडची संकल्पना मांडली. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तेव्हाची शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांचे सरकार सत्तेत असल्यामुळे कणकवली नगरपंचायतीला निधी मिळविण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. असे असतानाही विविध मार्गाने निधी खेचून आणत रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली. राज्यात सत्ता परिवर्तन होईपर्यंत रिंग रोडचा पहिला टप्पा नगरपंचायतीने पूर्णही केला. अर्थातच हे सत्ताधाऱ्यांचे फार मोठे यश होते. त्यानंतर तर नितेश राणे सत्तेत आल्यावर विशेष म्हणजे कणकवली शहराला पूर्ण वळसा घेणाऱ्या या रिंग रोडचे दोन टप्पे आज पूर्णत्वास गेले असून तिसरा टप्पा सुरूही झाला आहे. आता तर स्वतः नितेश राणे राज्यातील मंत्रिमंडळात वजनदार मंत्री व पालकमंत्री असल्याने येणार काळ कणकवलीकरांसाठी सुवर्णकाळ असेल अशी भाजपाची टीम आवर्जून सांगत आहे.
सीबीएससी बोर्ड कणकवलीत
कणकवलीत उत्कृष्ट शिक्षणाची सोय व्हावी अशी कणकवलीकारांची मागणी होती. याच मागणीची दखल घेत तत्कालीन आमदार, विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलशी संपर्क साधला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बांधणीसाठी नगरपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली. त्या स्कूलपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक रस्ताही कणकवली नगरपंचायतीने केला. अर्थातच या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा लाभ आज केवळ कणकवलीच नव्हे तर जिल्हाभरातील विद्यार्थीही घेत आहेत. हे देखील नारायण राणे, नीतेश राणेंच्या कुशल नेतृत्वात कार्यरत असलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांचे मोठं यश आहे.
कोरोना कळतही लक्षवेधी कामगिरी
त्याकाळी राज्यात भाजपची सत्ता नसल्याने कणकवली नगरपंचायतीला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यातच जगभरात कोरोना घोंगावला. साहजिकच निधीची आणखीनच कमतरता भासली. मात्र, याच कालावधीत कणकवलीकर नागरिकांना सावरण्याचे खरे काम पालकमंत्री नितेश राणे यांचे शिलेदार समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली केले. एकीकडे रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते, हे लक्षात घेऊन कणकवली ही स्वतःचे कोरोना सेंटर स्थापन करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत बनली. तब्बल 500 रुग्णांनी त्यावेळी कोरोना सेंटरचा लाभ घेतला. विशेष म्हणजे इथे चांगल्या सोयी - सुविधा पुरविल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. तर नलावडे, बंडू हर्णे व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनेकांना तेव्हा आवश्यक असणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही उपलब्ध करून दिले होते. कणकवली शहरात कोरोना पसरू नये यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर गेटही उभे केले होते. नगरपंचायतीच्या या कामगिरीचे कणकवलीकर नागरिकांनी तेव्हा फार मोठं कौतुकही केल होते. विशेष म्हणजे कोरोनामध्ये ज्या व्यक्तींचे निधन झाले त्यांच्या पत्नींना प्रत्येकी 25 हजार रुपये मदत नगरपंचायतीने दिली होती. नागरिकांच्या हितासाठी अनेक बाबी शासन निकषाच्या बाहेर जाऊनही त्याकाळी नगराध्यक्ष समीर नलावाडे यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून केल्या या विशेष.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पूर्णत्वास
2013 मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात आली. त्यावेळी संदेश पारकर हे देखील नारायण राणेंच्या सोबत होते. मात्र पारकर यांनी त्यावेळी काँग्रेसची साथ सोडत तेव्हाच्या अखंड शिवसेनेच्या मदतीने स्वतःचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवला होता. या काळात स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी निधी मंजूर झाला होता. मात्र तत्कालीन नगराध्यक्षा माधुरी गायकवाड या स्पोर्ट कॉम्प्लेक्स कामाला सुरुवात करू शकल्या नाहीत. मात्र पुढे नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची कणकवली नगरपंचायतवर सत्ता आल्यानंतर समीर नलावडे यांनी स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणीला सुरुवात केली. अर्थात पुढील काही कालावधीतचं दर्जेदार स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभाही राहिला. याच स्पोर्ट कॉम्प्लेक्स 'फेज टू' चे काम लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये अत्याधुनिक स्विमिंग पूल, अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम, बॉलिंग मशीन, हॉलीबॉल अशा विविध खेळांची प्रॅक्टिस करता येणार आहे.
सत्ता आली अन् निधीची गंगा वाहू लागली
राज्यात भाजपा व शिंदे शिवसेना यांची सत्ता आल्यानंतर कणकवली नगरपंचायतीच्या वतीने तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कणकवलीसाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर केला. 'कणकवली ही नारायण राणेंची भूमी आहे. हक्काने निधी मागा.' असे आश्वासन त्यावेळी शिंदे यांनी दिले होते. अर्थात याच निधीतून रिंग रोडचा दुसरा टप्पा पूर्णत्वास गेला. कृत्रिम धबधब्याचा आराखडा खूप याच निधीतून कृत्रिम धबधबाही पूर्ण झाला. कणकवली शहरातील अनेक रस्ते तयार झाले. यामध्ये तेलीअळी ते विद्यानगर जोडणारा रस्ता, म्हाडेश्वर कॉम्प्लेक्स ते नाथ पै नगर रस्ता, कणकवली शहरातील अनेक गणपती सान्यांचे विकसीकरण, टेंबवाडी ते भालचंद्र मॉल जोडणारा रस्ता, वरचीवाडी येथील अंतर्गत रिंगरोड, कनकनगर येथे परस्परांना जोडलेले रस्ते अशी बरीच कामे पूर्णत्वास गेली. जुन्या भाजी मार्केट नजीक सुसज्ज असे प्रसाधनगृहही उभारले गेले.
अद्ययावत गार्बेज डेपो
कणकवली शहराच्या हद्दीवर मुडेश्वर मैदानानजीक नगरपंचायतीचा गारबेज डेपो आहे. डेपोमध्ये अद्ययावत मशिनरी आणल्या गेल्या. तेथे ओला कचरा - सुका कचरा असे वर्गीकरण करून खतनिर्मितीही केली जाते. त्यासाठी आवश्यक त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स तेथे उभारल्या गेल्या आहेत. साहजिकचं कणकवली शहर स्वच्छतेतुन सुंदरतेकडे एक पाऊल पुढे आहे.
बारामाही धबधबा आणि ब्रिज
कणकवली शहरातील नागरिकांना विरूंगळा म्हणून शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या गणपती साना येथे बारामाही कृत्रिम धबधबा उभारला गेला. अर्थातच या धबधब्याचा विशेष करून बच्चे कंपनी मनमुराद आनंद लुटत असते. कणकवली आणि जानवली अशी दोन गावे जोडणारे जानवली नदीवरील ब्रिजही पूर्णत्वास गेले . जानवली येथे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल असून कणकवली शहरातील कित्येक मुले या शाळेत शिकत असतात. अर्थातच हे पूल झाल्याने या मुलांचा प्रवासही सुखकर झाला आहे.
प्रशासक काळातही मोठा निधी
2013 मध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर प्रशासकाचा काळ सुरू झाला. मात्र पालकमंत्री नितेश राणे यांनी या काळातही कणकवली नगरपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. याच निधीतून स्पोर्ट कॉम्प्लेक्स 'फेज टू' व अनेक रस्त्यांची कामेही होणार आहेत.
ई टॉयलेट्स
कणकवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारही असतात. शिवाय कणकवली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने येथे नागरिकांची कायमच वर्दळ असते. सहाजिकच येथे प्रसाधनगृहांची कमतरता भासत होती. हीच समस्या लक्षात घेऊन नगरपंचायतीतर्फे शहरातील उड्डाणपुलाखालील जागेत दोन 'ई टॉयलेट्स' उभारली गेली आहेत.
उद्यानांचे नूतनीकरण
महामार्ग चौपदरीकरणामध्ये कणकवली शहरातील श्रीधर नाईक उद्यान बाधित झाले. या उद्यानाचे नूतनीकरणही करण्यात आले. यासह अनेक स्मशान भूमींकडे जाणारे रस्तेही करण्यात आले आहेत. स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीदेखील कार्यान्वित करण्यात आली.
'विकास' हाच मुद्दा
कणकवलीत भाजप विरुद्ध कणकवली शहर विकास आघाडी अशी लढत होत आहे. यात आघाडीतर्फे भाजपवर सातत्याने वेगवेगळे आरोप केले जात आहेत. मात्र नितेश राणेंसह भाजपची सर्व मंडळी शांतच आहेत. गेल्या आठ वर्षांत आम्ही कणकवलीचा विकास केला आहे. आणि 'विकास' याच मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेलाही जाणीव आहे. आणि येत्या काळात केंद्रात, राज्यात व जिल्ह्यात सत्ता कुणाची आहे आणि कणकवलीचा विकास कोण करणार हे कणकवलीकरांना चांगल ठाऊक आहे, त्यामुळे पुन्हा एकदा विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वास भाजपची मंडळी व्यक्त करत आहेत.










