
कुडाळ : एसटी विभागातील कुडाळ येथील वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८, रा. सावंतवाडी) यांचा काल रात्री एमआयडीसी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री सुमारास १०.३० च्या दरम्यान ते कुडाळहून सावंतवाडीकडे घरी जात असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी येथील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरली. अपघातात वारंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना तात्काळ कुडाळ रुग्णालयात हलविले; मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
नीलेश वारंग यांनी वाहतूक नियंत्रक म्हणून सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ले व कणकवली येथे कार्यरत राहून सेवाभिमुख कामगिरी बजावली होती. ते शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा चे अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. बी. वारंग यांचे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ-वहिनी असा परिवार आहे. अपघाताच्या घटनेने एसटी विभागासह वारंग कुटुंबात शोककळा पसरली आहे.










