
कणकवली : कणकवलीतील आध्यात्मिक अधिष्ठान आणि कणकवलीकरांच्या हृदयात चिरंतन वास करणारे परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची भव्य दिव्य भावपूर्ण सांगता प्रसन्न वातावरणात संपन्न झाली. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांना पालखी खांद्यावर घेऊन बाबांची सेवा करण्याची देखील संधी मिळाली.
गुरुवारचा दिवस हा भालचंद्र महाराजांचा स्मरणदिन म्हणून मानला जातो आणि याच पवित्र दिनी पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होत असल्याने शहरात आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तिभावाचा दरवळ अधिकच अनुभवास येत होता. पुण्यतिथी महोत्सवाच्या अंतिम दिवशी निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण कणकवली शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी शहरातील प्रत्येक चौक, गल्ली आणि प्रत्येक घरात भक्ति - श्रद्धेची सुवासिक ज्योत प्रज्वलित झाली होती. शंख - घंटानाद, अभंगानंद आणि “जय जय भालचंद्र बाबा” च्या जयघोषात असंख्य भाविक पालखीच्या मागे एकरूप होत चालत होते. अनेकांनी मनोभावे सेवा, पूजा - अर्चा आणि प्रार्थना अर्पण करत आपली भक्ती व्यक्त केली.
या दैवी पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ चे अधिकृत उमेदवार अबिद नाईक यांनीही नतमस्तक होऊन सहभाग नोंदविला.महाराजांच्या पालखील खांद्यावर घेऊन काही पावले चालण्याचा लाभ घेतला त्यांनी ते ‘जीवनातील अविस्मरणीय क्षण’ असल्याचे भावना व्यक्त केल्या.धार्मिक वातावरणात राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी व्यक्त केलेला हा श्रद्धाभाव अनेकांच्या मनाला भावून गेला.
एकूणच, भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाने कणकवली शहर पुन्हा एकदा भक्ती, एकात्मता आणि आध्यात्मिकतेच्या तेजाने उजळून निघाले. महाराजांच्या कृपेचा आणि कणकवलीकरांच्या दाट श्रद्धेचा हा आल्हाददायक सोहळा दीर्घकाळ स्मरणात राहील, अशीच भाविकांची भावना होती.










