
कणकवली : कलमठ बाजारपेठ येथील निळकंठ प्रभू यांचे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले. पण, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, घरफोडीत काहीच मिळाले नाही, या रागातून चोरट्यांनी चक्क घरासमोर बसलेल्या कुत्र्याला ठार मारले. हा प्रकार सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
निळकंठ प्रभू हे आपले घर बंद करून वेंगुर्ले येथे गेले होते. ही संधी चोरट्यांनी साधत सोमवारी पहाटेच्या सुमारास बंद असलेल्या घराचे पुढील व मागील दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या रागातून घरासमोर बसलेल्या कुत्र्याला चोरट्यांनी ठार मारले. प्रभू यांच्याकडे काम करणारी महिला कामगार सकाळी आली असता तिला कुत्रा मृतावस्थेत दिसून आला. त्यानंतर तिला घराच्या दरवाजांचा कडीकोयंडा तोडलेला दिसून आला. तिने घरात प्रवेश केला आतील साहित्य अस्थाव्यस्त पडलेले दिसून आले. हा घडलेला प्रकार तिने शेजारी असलेल्या सचिन कुवळेकर यांना सांगितला. कुवळेकर यांनी पोलिसांना कळविले. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा केला. कुवळेकर यांनी निळकंठ प्रभू यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळविले. मात्र, ते बाहेर असल्याने या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात झाली नव्हती.