
कणकवली : शहरातील नाथ पै नगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण (एलसीबी)च्या पथकाने छापा टाकून १४ हजार ३०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी सायंकाळी ४.३० वा. केली. याप्रकरणी संदीप अरुण तोरसकर (५१, रा. नाथ पै नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीच्या पथकाला नाथ पै नगर परिसरात एक व्यक्ती दारू बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने संदीप तोरसकर याच्या घरात छापा टाकला असता त्याच्या घरात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी दारू जप्त केली. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार किरण देसाई यांनी केली. याबाबत राजेंद्र जामसंडेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप तोरसकर याच्याविरोधात महाराष्ट्रात बंदी असलेली दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार विनोद सुपल करीत आहेत.