
कणकवली : पर्यावरणाची स्नेहबंधाचे नाते निर्माण करण्यासाठी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून माध्यमिक विद्यालय नाटळ प्रशालेत वृक्षबंधन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. भाऊ बहिणीचे नाते राखी बांधून जसे वृद्धिंगत होते व भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी कटिबद्ध असतो. त्याप्रमाणेच वृक्ष पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवून मानव प्रजातीचे संरक्षण करतात. हा उदात्त हेतू विचारात घेऊन राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र सावंत व विद्या समिती अध्यक्षा उमा भालचंद्र सावंत यांच्या संकल्पनेतून वृक्षबंधन उपक्रमाची सुरुवात प्रशालेमध्ये करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना काजूची 300 रोपे वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांना या रोपांच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली जेणेकरून या रोपांशी त्यांचे नाते अधिक दृढ होऊन पर्यावरणाशी विद्यार्थ्यांची नाळ जोडली जाईल. याप्रकारे भविष्यात पर्यावरण संवर्धनाचे अनेक उपक्रम राबविण्याचा प्रशालेचा मानस आहे.
या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय समिती चेअरमन श्री.नितीन सावंत सर्व संस्था पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी सदर उपक्रमाचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.