
कणकवली : कणकवली शहरातील कणकवली - आचरा मार्गावरील सना कॉम्लेक्स येथील मंगेश तळगांवकर यांचे ज्वलेर्स शॉप चोरट्यांनी फोडल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुरुवारी कणकवली शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, चोरट्यांचा मागमूस लागू शकलेला नाही. चोरीच्या तपासासाठी पोलिसांच्या विविध पथकांची नेमणूक करण्यात आल्याचे कणकवली पोलिसांनी सांगितले.
ही चोरी बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. चोरीप्रसंगी चार चोरटे तळगांवकर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. चोरटे येथील सोनगेवाडी रस्त्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने पोलिसांनी सर्वप्रथम या मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, चोरटे नेमके कुठे गेले, हे समजू न शकल्याने पोलिसांनी संबंध शहर परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तर पोलिसी तपासात चोरट्यांनी चोरलेल्या दागिन्यांपैकी चांदीच्या दागिन्यांचा एक बॉक्स येथील मराठा मंडळ सभागृहानजीक आढळून आला. या बॉक्समध्ये १८५ ग्रॅमची चांदी होती, असेही पोलिसांनी सांगितले. कदाचित चोरट्यांकडून हा बॉक्स चुकून पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे करीत आहेत.