
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे.येथील कणकवली महाविद्यालच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून मत मोजणीला प्रारंभ होणार आहे.याकरिता एकूण १४टेबलावरुन इव्हिएम मशीनमधील मतांच्या २४फे-या होणार आहेत.तसेच ६ टेबलवर टपाली मतांची मोजणी केली जाणार आहे. यासाठी २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.संपुर्ण मतदारसंघाचा निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्यात विधानसभेसाठी २०नोव्हेबरला मतदान झाले.याकरिता कणकवली मतदारसंघात तब्बल १लाख ६१हजार १७७मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्याची मतमोजणी उद्या (ता.२३)होणार आहे.याकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कणकवली कॉलेज मध्ये पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण ३३२ मतदान केंद्रे असून यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होताना, प्रत्येक ठिकाणी ३ कर्मचारी व टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी व इतर ५० कर्मचारी मिळून ११६ कर्मचारी काम पाहणार आहेत. एका फेरीत १४ केंद्रांची मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी अधिकार असणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.
या मतमोजणीसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. शहरातील संजीवनी हॉस्पिटल परिसर महायुतीचे उमेदवार नितेश राणे, अपक्ष उमेदवार संदेश परकर, कणकवली नगरपंचायत रोड महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, अपक्ष उमेदवार गणेश माने आणि कणकवली तहसिल कार्यालय येथे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी, बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांच्य कार्यकर्त्यांसाठी प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस अधिकारी, १५० पोलीस, २ दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती कणकवली पोलीस निरिक्षक मारुती जगताप यांनी दिली.
कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.या मतदारसंघात आमदार नितेश राणे विरुध्द संदेश पारकर यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र मतदार आपला कौल कोणाला देताहेत हे अवघ्या काही तासांतच समजणार आहे.