कणकवलीत जलशुद्धीकरण यंत्रणा वर्षभर बंद !

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 28, 2023 18:17 PM
views 271  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीची नळयोजनेची जलशुद्धीकरण यंत्रणा तब्‍बल वर्षभर बंद राहिली आहे. त्‍यामुळे गडनदीपात्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करताच हे पाणी थेट शहरवासीयांना पुरवले जात आहे. दरम्‍यान, नळयोजनेच्या दुरूस्तीसाठीचा प्रस्ताव नगरपंचायत प्रशासनाने जिल्‍हा नियोजनकडे पाठवला आहे. या खर्चाला मंजुरी मिळाल्‍यानंतर निविदा प्रक्रिया होऊन नळयोजनेची दुरूस्ती होणार आहे. ताेपर्यंत शहरवासीयांना कोणतीही प्रक्रिया न केलेल्‍या पाण्याचाच वापर करावा लागणार आहे.

मुडेश्‍वर मैदानासमोर असलेल्‍या डोंगरावर नगरपंचायतीची जलशुद्धीकरण यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा सध्या ओस पडल्‍याचे चित्र आहे. जलशुद्धीकरण प्लांट वर्षभर बंद असल्‍याने अनेक फिल्‍टर्सना आणि इतर यंत्रसामुग्रीला गंजही चढला आहे. नदीपात्रातील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता हे पाणी थेट ग्राहकांना पुरवले जात असल्‍याने शहरवासीयांच्या आरोग्‍यालाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. कणकवली शहरातील काही घरांच्या ठिकाणी खासगी विहिरी आहेत. तर शहरातील इतर अनेक घरे तसेच भाड्याने राहणाऱ्या कुटुंबांना नळयोजना पाण्याचा आधार राहिला आहे. याखेरीज मे अखेरीस खासगी विहिरींतील जलस्त्रोत आटल्‍यानंतर नगरपंचायतीच्या नळयोजनेतून पुरविल्‍या जाणाऱ्या पाण्यावरच नागरिकांचे अवलंबित्व राहिले आहे.
  
कणकवली शहरवासीयांना यंदा एप्रिल पासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात आल्‍यानंतर कणकवलीवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली होती. परंतु, गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासूनच जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडल्‍याने नागरिकांना नदीपात्रातीलच पाण्याचा थेट पुरवठा करण्यात आला. यात अनेक नागरिकांनी गढूळ पाणी येत असल्‍याच्या तक्रारीही केल्‍या होत्या. कणकवली शहरवासीयांना पूर्वी जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लगत असलेल्‍या गडनदीपात्रातून पाणी उपसा केला जात होता. मात्र, येथील बंधारा कोसळल्‍यानंतर जलशुद्धीकरण यंत्रणेपासून दोन किलोमिटर अंतरावरील कनकनगर येथील डोहात साठणारे पाणी शंभर अश्र्वशक्‍तीच्या पंपातून उचल केले जाते. हे पाणी मुडेश्‍वर मैदानालगत असलेल्‍या पाण्याच्या टाकीत साठवले जाते. नगरपंचायतीच्या नळयोजनेतून दररोज २० लाख लिटर्स पाणी शहरातील नळयोजना ग्राहकांना पुरवले जाते. नदीपात्रातून मुख्य जलशुद्धीकरण केंद्रात आणलेले पाणी प्रक्रिया करून ते शिवाजीनगर, बांधकरवाडी आणि कलमठ येथील पाणी टाक्‍यांमध्ये साठवले जाते. त्‍यानंतर नळ कनेक्‍शनच्या माध्यमातून ग्राहकांना या पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्राहकांना दिवसभरातून एक तास पाणी नळयोजनेच्या माध्यमातून दिले जाते. त्‍यासाठी प्रत्‍येकी ८०६ रूपये वार्षिक पाणीपट्टीची आकारणी प्रत्‍येक नळ ग्राहकाला केली जाते. सध्या जलशुद्धीकरण यंत्रणा बंद असल्याने नदीपात्रातील पाणी थेट पाण्याच्या टाक्यांमध्ये साठवून ते नागरिकांना पुरवले जात आहे.

शिवडाव धरणावरच नळयोजनेचे अवलंबित्‍व
 शहरातील कनकनगर येथील बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाच्यावतीने दरवर्षी पाणीसाठा केला जातो. मात्र, प्लेट योग्‍यरित्‍या बसविण्यात न आल्‍याने बंधाऱ्याला गळती लागून पाणी वाया जातो. यात एप्रिल अखेरपर्यंत नदीपात्रातील डोह आटतात. त्‍यामुळे नगरपंचायतीला दोन ते अडीच लाख रूपयांची पाणीपट्टी भरून शिवडाव धरणातील पाणी सोडण्याची मागणी करावी लागते. ही स्थिती बदलण्यासाठी गतवर्षी नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी गडनदीपात्रातील बंधाऱ्याचे नियोजन नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्याचे निश्‍चित केले होते. परंतु त्‍याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे पुढीलवर्षी देखील मे महिन्यात नदीपात्रातील पाणीसाठा आटला तसेच मान्सून लांबला तर शिवडाव धरणातील पाण्यातूनच कणकवलीकरांची तहान भागवली जाणार आहे.

नळयोजनेच्या आधुनिकीकरणाची गरज
कणकवली नगरपंचायतीने पाच वर्षापूर्वी नळयोजनेचे आधुनिकीकरण करून जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र या यंत्रणेची कार्यक्षमता संपली असून अनेक संयत्रे गंजलेली आहेत. याखेरीज शहरात पंचवीस वर्षापूर्वी टाकण्यात आलेले नळयोजनेचे पाईप देखील ठिकठिकाणी फुटत आहेत. त्‍यामुळे शहरातील संपूर्ण नळयोजनेचे आधुनिकीकरण आवश्‍यक झाले आहे.

कणकवली नळयोजनेला दरवर्षी ३५ लाखांचा तोटा
कणकवली शहरात फक्‍त १६०० नळ कनेक्‍शन ग्राहक आहेत. त्‍यांना प्रतिदिनी २० लाख लिटर्स पाणी पुरवठा केला जातो. ही योजना चालविण्यासाठी नगरपंचायतीला वर्षाला ५० लाख रूपयांचा खर्च येतो. तर नळ योजनेतून केवळ १३ लाख ५० रूपयांची पाणीपट्टी वसूल होते. त्‍यामुळे दरवर्षी नगरपंचायतीला नळयोजना चालवताना ३५ ते ३६ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

मुख्याधिकारी यांनी सांगितले की, नगरपंचायतीचा कार्यभार स्वीकारल्‍यानंतर लगेच आपण नळयोजना जलशुद्धीकरणाचा आढावा घेतला होता. त्‍यावेळी ही यंत्रणा बंद असल्‍याचे लक्षात आल. त्‍यामुळे तातडीने जलशुद्धीकरण यंत्रणा दुरूस्ती करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्‍हा नियोजनकडे पाठवला आहे. या खर्चाला मंजूरी मिळाल्‍यानंतर लगेच निविदा प्रक्रियांची कार्यवाही करून कणकवली नळयोजनेची जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे असे नगरपंचायत कणकवली मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले