
कणकवली: पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर आता कणकवली पोलीसही सतर्क बनले आहेत. शुक्रवारी सायंकाळी कणकवली पोलिसांनी तालुक्यात दोन ठिकाणी अवैध गुटखा विक्रीवर छापा टाकला. दोन्ही ठिकाणी मिळून २२ हजार १४५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
कणकवली - कनेडी मार्गावरील कणकवली रेल्वे स्टेशननजीक गोपाळ मुरारी बोभाटे (६८, कणकवली - वरचीवाडी) हा एका टपरीरनजीक अवैध गुटखाविक्री करत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकून ४ हजार ४१५ रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सायंकाळी ६.३० वा. सुमारास करण्यात आली. याची फिर्याद हवालदार विनोद सुपर यांनी दिली. वरवडे - फणसनगर येथे शक्ती अय्यर तेवर (४९, रा. वरवडे - फणसनगर( हा राहत्या घराच्या बाजूला उघड्या पत्राच्या पडवीत गुटखाविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी तिथे धाड टाकून १७ हजार ७३० रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सायंकाळी ५.३० वा. सुमारास करण्यात आली. याची फिर्याद कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंबरे यांनी दिली.