
कणकवली : अवकाळी पावसामुळे कणकवली - आचरा रस्त्यावर असणा-या वरवडे पुलाला दिलेला नदीपात्रातील पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे कलमठ बाजारपेठ येथून कुंभारवाडी , वरवडे मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. या कणकवली आचरा वरवडे पुलावरुन वाहतूक सुरु करण्यासाठी ठेकेदाराकडून काम युध्दपातळीवर सुरु आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला मातीभराव पूर्ण झाला आहे. 15 जुनपर्यंत वाहतूक सुरु करण्याचे नियोजन बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच कणकवली - आचरा प्रवास करणा-या नागरिक ,वाहनचालकांची गैरसोय दूर होणार आहे.
कणकवली - आचरा या मुख्य मार्गावर असलेला वरवडे पूल पूरस्थिती निर्माण झाल्यावर कायम पाण्याखाली जात असायचा , त्यामुळे या पुलाची उंची वाढवत नवीन रस्ता रुंदीकरण कामामध्ये या पुलाची उभारणी हाती घेण्यात आली. परंतु अवकाळी पावसाने 19 मे पासूनच जोरदार सुरुवात केली. परिणामी या पुलाच्या कामादरम्यान नदीपात्रातून काढलेला रस्ता नदीला आलेल्या पाण्यामुळे वाहून गेला. त्यामुळे कणकवली - आचरा मुख्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्याला पर्यायी रस्ता कलमठ – कुंभारवाडी वरवडे गावातून उर्सुला स्कुल येथुन सध्या सुरु आहे. मात्र या रस्त्याच्या ठेकेदाराकडून जोरदार यंत्रणा लावत काम युध्दपातळीवर सुरु केले आहे. संभाव्य 12 ते 15 जुनपर्यत या वरवडे पुलावरुन वाहने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.