कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ICU सेवा सुरू

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 15, 2026 15:16 PM
views 45  views

कणकवली :  कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अखेर आय.सी.यू. (अतिदक्षता विभाग) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत आयसीयू सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान ही सेवा तातडीने सुरू करण्याची आग्रही सूचना देखील केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे आता रुग्णालयात आयसीयू ( अतिदक्षता विभाग ) ही महत्त्वाची आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे.

कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. विशेषतः आर्थोपेडिक शस्त्रक्रियांचे प्रमाणही येथे जास्त आहे. मात्र, आयसीयू सुविधेअभावी गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय किंवा जिल्ह्याबाहेर हलवावे लागत होते. आता ही सेवा स्थानिक पातळीवर सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या आणि तातडीच्या उपचारांची गरज लक्षात घेऊन ही सुविधा सुरू केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.