
कणकवली : सिंधुदुर्गात अमली पदार्थामुळे युवा पिढी बरबाद होत असून अनेक तरूण आत्महत्या करत आहेत. तर पोलिसांच्या आशीर्वादाने मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस यंत्रणेकडून यावर कारवाई न झाल्यास शिवसेना अवैध धंद्यावर धाड टाकणार, असा इशारा शिवसेना नेते, माजी आमदार परशूराम उपरकर यांनी दिला. येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.उपरकर म्हणाले, पोलीस यंत्रणेकडून अमली पदार्थ आणि मटक्यावर आठवड्यातून एक - दोन दिवस धाड टाकल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र अमली पदार्थाचे नेटवर्क वेगाने विस्तारत आहेत. अमली पदार्थामध्ये अडकलेल्या तरूणांवर अखेर आत्महत्येची वेळ येत आहे. वर्षाला सरासरी अशा दीडशे आत्महत्या जिल्ह्यात होत आहेत.
सिंधुदुर्गात पट आणि जुगार देखील खुलेआम सुरू झाले आहेत. पोलीस मुख्यालयापासून अवघ्या चार किलोमिटर अंतरावर ओरोस खुर्द येथे मोठा जुगार अड्डा चालतो. त्यासाठी दीड लाखापर्यंत हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. याखेरीज सिंधुदुर्गात माजगाव, कोलगाव, नरेंद्र डोंगर, इन्सूली, निवती, वेंगुर्ले, कलमठ, मसुरे, वराड, कट्टा या ठिकाणी देखील खुलेआम जुगार सुरू आहे, असा आरोपही उपरकर यांनी केला.
सिंधुदुर्गात सुरू असलेलया या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे. पालकमंत्री आणि राज्याचे गृह मंत्री देखील मटका, जुगार रोखण्यात अपयशी ठरले आहेत. येत्या काही दिवसांत पोलिसांनी पूर्णत: अवैध धंदे बंद न केल्यास शिवसेनाच अशा अवैध धंद्यांवर धाड मारून ते बंद करणार असल्याचा इशारा श्री.उपरकर यांनी दिला.










