नितेश राणे धृतराष्ट्राच्या भूमिकेत

कन्हैया पारकरांनी सांगितलं भाजपच्या पराभवाचं कारण
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 27, 2025 14:42 PM
views 133  views

कणकवली : कणकवलीत नगराध्यक्षांच्या दालनातील नारायण राणे यांचा फोटो शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढला, हा समीर नलावडे यांनी केलेला आरोप पूर्णतः खोटा आहे. शहर विकास आघाडीने ही निवडणूक भाजपच्या विरोधात लढवली होती. मात्र, नारायण राणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची हरकत नसेल तर त्यांचा फोटो नगराध्यक्षांच्या दालनात लावणे काहीच वावगे ठरणार नाही, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे माजी उपनगराध्यक्ष तथा संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर यांनी स्पष्ट केले. 

येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना पारकर म्हणाले, यापूर्वी आम्ही नारायण राणेंच्या विचारधारेपासून बाजूला होतो, तेव्हा कणकवली नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नारायण राणेंचा फोटो काढला होता, ही‌ बाब खरी आहे. मात्र, आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगराध्यक्ष दालनात प्रथम प्रवेश केला, त्यावेळी तेथील कोणतेही फोटो आम्ही काढलेले नाहीत. वास्तविक, त्यावेळी तेथे कुठलेच फोटो नव्हते.  त्यामुळे समीर नलावडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. त्यामुळे प्रशासनानेच याबाबत माहिती घेऊन खुलासा करावा, अशी अपेक्षाही पारकर यांनी व्यक्त केली. 

नारायण राणे ज्येष्ठ नेते कणकवली नगरपंचायत निवडणूक आम्ही कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून घडविली होती. शहर विकास आघाडी मध्ये सर्वच पक्षांचा सहभाग होता. यात नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे देखील आम्हाला मोठे पाठबळ मिळाले. मात्र, ही निवडणूक आम्ही भाजपच्या विरोधात लढवली होती. मात्र, नारायण राणे हे भाजपमध्ये असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असून स्थानिक खासदार देखील आहेत. त्यांची हरकत नसेल तर त्यांचा फोटो नगराध्यक्ष दानात लावण्यात काहीही वावगे नाही. तर फोटोंचे राजकारण संदेश पारकर यांनी कधीच केले नाही, असेही कन्हैया पारकर म्हणाले.‌

...‌ त्यामुळेच भाजपचा पराभव 

समीर नलावडे हे मनमानी, हुकूमशाही पद्धतीने वागतात, अशा तक्रारी कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केल्या होत्या. तरी देखील नितेश राणे धृतराष्ट्राच्या भूमिकेत राहिले. या उलट निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीच्या रथाचे श्रीकृष्णाप्रमाणे सारथ्य केले. समोर आपलेच कार्यकर्ते आहेत, असे असताना आपण निवडणूक कशी लढावी? असा प्रश्न शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते निलेश राणेंना विचारत होते. त्यावेळी निलेश राणे यांनी, जर ते आपले असतील तर आपल्या सोबत का नाहीत? आपल्यासमोर का आहेत? अशा शब्दांमध्ये मार्गदर्शन केले होते. संदेश पारकर विजयी होत नाहीत तोपर्यंत शांत बसू नका, असेही ते कार्यकर्त्यांना म्हणाले होते. याचाच परिणाम म्हणजे नितेश राणे आणि त्यांच्या भाजपचा पराभव झाला तर कणकवली शहर विकास आघाडीचा विजय झाला, असेही पारकर म्हणाले.

समीर नलावडेंवर टीका

समीर नलावडे हे फक्त फोटोंचेच राजकारण करू शकतात. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या समीर नलावडे यांनी स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयातील नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांचे फोटो काढून टाकले. कार्यालयात भाजपची कमळ निशाणी सुद्धा दिसत नाहीत. याचा अर्थ पराभवानंतर काही तासांतच ते भाजपच्या बाबतीत कृतघ्न झाले, अशी टीका देखील पारकर यांनी केली. तर सात - आठ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी आप्पासाहेब पटवर्धन यांचा स्टॅचू नगरपंचायतीला भेट दिला होता, तो आता नेमका कुठे आहे, असा सवाही पारकर यांनी केला. 

... म्हणूनच संदेश पारकर विजयी

संदेश पारकर यांचा स्वभाव लोकांना आवडतो. गेल्या 30 वर्षात त्यांनी स्वतःच्या या स्वभावात जराही बदल केला नाही. सर्वांशी आपुलकीचे नाते ठेवत ते पुढे जात राहिले. हाच स्वभाव त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला. आता निवडणुका संपल्या आहेत. संदेश पारकर व सर्व 17 नगरसेवकांनी आता राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षाही पारकर यांनी व्यक्त केली.