सावंतवाडी परीट समाजातर्फे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी

Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2025 15:39 PM
views 37  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे परीट समाजातर्फे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भरगच्च कार्यक्रमात साजरी करण्यात आली.

यावेळी सकाळी आठ वाजता एसटी स्टँड परिसर,काझी शहाबुद्दीन परिसर व प्रांत ऑफिस  परिसर येथे साफसफाई करण्यात आली व त्यानंतर नऊ वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री व सौ सुनील वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता परीट समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले, संत गाडगेबाबा यांच्या नावाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री संत गाडगेबाबा भवन बांधण्याचा मानस आहे व सर्व परीट समाज बांधवांनी एकजुटीने या भवनासाठी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन केले आहे.यावेळी व्यासपीठावर परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष राजू भालेकर,उपाध्यक्ष स्वप्निल कदम, भगवान वाडकर,सेक्रेटरी लक्ष्मण बांदेकर,सह सेक्रेटरी सुरेंद्र कासकर,खजिनदार जितेंद्र मोरजकर,सहखजिनदार किरण वाडकर,वेंगुर्ला तालुका अध्यक्ष महेंद्र आरोलकर, महिला जिल्हाध्यक्ष दिपाली भालेकर, जिल्हा खजिनदार संदीप बांदेकर, युनियनचे अध्यक्ष प्रदीप भालेकर, महिला तालुका अध्यक्ष देवयानी मडवळ, जिल्हा सदस्य संजय होडावडेकर, रितेश चव्हाण, शहर अध्यक्ष दयानंद रेडकर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी अकरा वाजता ह.भ.श्रीमती ललिन तेली यांचे श्री संत गाडगेबाबा जीवनपटावर सुश्राव्य असे किर्तन सादर करण्यात आले या कीर्तनाच्या माध्यमातून देश स्वतंत्र होण्याच्या आधीही श्री संत गाडगेबाबा यांनी गावोगावी फिरून लोकांना स्वच्छतेचे व शिक्षणाचे महत्त्व कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले होते तसेच श्री संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सावंतवाडीच्या पुण्यभूमीत आम्ही सावंतवाडीकर राहतो याचा सर्वस्वी अभिमान परीट समाजातील सर्व बंधू-भगिनींना आहे.आता सध्याचे भाजी मार्केट पूर्वीचे गाडी तळ म्हणून ओळखण्यात येत होते या ठिकाणी संत गाडगेबाबा यांची कीर्तने होत असत म्हणून त्या ठिकाणी भाजी मार्केटला श्री संत गाडगेबाबा भाजी मंडई म्हणून नाव देण्यात आले आहे. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, प्रशासक अधिकारी श्री अंधारे नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व भक्त मंडळींना तीर्थप्रसाद व महाप्रसाद देण्यात आला तसेच तीन वाजता महिला भगिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर भजन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमावेळी जिल्ह्यातील परीट समाजातील बहुसंख्या बंधू भगिनी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका परीट समाज व सावंतवाडी तालुका महिला परीट समाज यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत तालुकाध्यक्ष राजू भालेकर व आभार शहराध्यक्ष दयानंद रेडकर यांनी मानले.