प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने आडाळी गावचा अभिनव उपक्रम

विद्यार्थ्यांना बांबू - चारकोलचे टूथब्रश वाटप
Edited by:
Published on: December 27, 2025 15:04 PM
views 20  views

दोडामार्ग : प्लास्टिक ही आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली असून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, किंबहुना झोपेतही प्लास्टिक आपली साथ सोडत नाही. या प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता समाजात विविध पातळ्यांवर जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आडाळी गावचे उपक्रमशील सरपंच पराग गावकर यांनी प्लास्टिक निर्मूलनासाठी एक आगळा-वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे.

सरपंच पराग गावकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या ऐवजी बांबू स्टीक व चारकोलपासून तयार केलेले पर्यावरणपूरक टूथब्रश भेट म्हणून दिले. सकाळी सर्वसामान्य माणसाची प्लास्टिकशी पहिली ओळख टूथब्रशपासूनच होते, ही बाब लक्षात घेऊन हा प्रयोग करण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, प्लास्टिकचे दुष्परिणाम समजावेत आणि पर्यायी, निसर्गपूरक वस्तूंचा वापर वाढावा, हा उद्देश आहे. “प्लास्टिक निर्मूलनाच्या चळवळीत हे तीळभर का होईना, पण योगदान ठरावे,” अशी माफक अपेक्षा सरपंच पराग गावकर यांनी व्यक्त केली. या अभिनव उपक्रमाचे शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांकडून स्वागत होत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आडाळी गावाने एक सकारात्मक आदर्श घालून दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे.