'मुक्ताई' ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी मिळवलं आंतरराष्ट्रीय रेटिंग

Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2025 15:33 PM
views 30  views

सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. गार्गी सावंत, यश सावंत, पुष्कर केळूसकर, हर्ष राऊळ, अथर्व वेंगुर्लेकर, बृंधव कोटला आणि पूर्वांक कोचरेकर या विदयार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी हे यश प्राप्त केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर राज्य व राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सहभाग घेणा-या बहुतांश मुलांनी कौस्तुभ पेडणेकरांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळवले आहे. ॲकेडमीचे अठ्ठावीस विदयार्थी आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त आहेत. मागील दहा वर्षात ॲकेडमीच्या विदयार्थ्यांनी सातत्याने राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवली आहेत.

मुक्ताई ॲकेडमीचा जिल्ह्यातील आघाडीचा खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर हा स्टँडर्ड, रॅपिड आणि ब्लिट्ज या तीनही प्रकारात जिल्ह्यात सर्वोच्च गुणांकन मिळवणारा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू ठरला आहे! तसेच ॲकेडमीचा मालवण येथील पन्नास टक्के दृष्टिदोष असलेला मयुुरेेश परुळेकर आणि जिल्ह्यातील वयाने सर्वात लहान आठ वर्षीय खेळाडू पूर्वांक कोचरेकर हे आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहेत ! कौस्तुभ पेडणेकर सावंतवाडी शहर आणि तालुक्यातील विदयार्थ्यांसोबतच कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग, कणकवली, मालवण येथील विदयार्थ्यांना बुदधिबळ प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. दररोज बुदधिबळ बोर्डवर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारी जिल्ह्यातील ही एकमेव ॲकेडमी आहे. या विदयार्थ्यांच्या कामगिरीवर मुक्ताई ॲकेडमी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर "बेस्ट ॲकेडमी" हा पुरस्कार मिळवणारी कोकणातील एकमेव ॲकेडमी ठरली आहे! सर्व स्तरातून विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.