कणकवली तहसीलदारांनी नागरिकांना केलंय 'हे' आवाहन

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 20, 2023 22:17 PM
views 292  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील गडनदी व जाणवली नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पाणी येण्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच पाणी आलेल्या मोरी, नाले आधी ठिकाणातून वाहने घालू नये किंवा चालत जाण्याचे धाडस करू नये असे आवाहन कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी केले आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गड नदी व जाणवली नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा स्थितीत नदीपात्रालगतच्या सकल भागांमध्ये पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. शहरातील गणपती साना येथेही पाणी येण्याचा धोका असल्याने तेथे कोणीही उतरण्याचे धाडस करू नये. गड नदीवरील मराठा मंडळ कडून गोपूरीकडे जाणारा बंधारा वाहतुकीसाठी तुर्त बंद करण्यात आलेला आहे. आचरा रोडवरही काही ठिकाणी पाणी आले असून अशा स्थितीत कुणीही पाण्यातून वाहने घालण्याचे अथवा चालत जाण्याचे धाडस करू नये. गावागावांमध्ये ही छोट्या मोऱ्या अथवा रस्त्यांवर पाणी येण्याच्या धोका असून अशा ठिकाणीही पाणी कमी झाल्याशिवाय वाहने घालू नयेत. आवश्यकता भासल्यास तातडीने आपत्कालीन कक्ष 02367-232025 व 9422746906 येथे संपर्क साधावा असेही आवाहन तहसीलदार पवार यांनी केले आहे.