
कणकवली : कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोमवारी ७ रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी ११ वा. रवळनाथ मंदिरातील देवतरंग स्वयंभू देवाच्या दर्शनासाठी जातील. दुपारी १२ वा. स्वयंभू देवाची विधीवत पूजा होईल. दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर रवनाथ मंदिर ,काशीविश्वेश्वर मंदिर व स्वयंभू मंदिर येथे टिपर पाजळला जाईल व रात्री दीपोत्सव, देवतरंगांसह प्रदक्षिणा होईल. रात्री १ वा. राठिवडे येथील दशावतार नाट्यमंडळाचा प्रयोग सादर होणार आहे. हा जत्रोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कणकवली शहरात दाखल झाले आहेत.