कणकवली कनेडी राज्यमार्ग खड्डेमुक्त !

प्रवास होणार सुपरफास्ट !
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 20, 2024 11:16 AM
views 970  views

कणकवली : कणकवली शहरापासून कनेडी बाजारपेठेपर्यंत आता राज्यमार्ग रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण झाल्याने वाहने सुसाट धावू लागली आहेत. खड्डा मुक्त रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना आता वेगावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यंदा या रस्त्याचे काम हाती घेऊन आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कणकवली शहर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे दळणवळणाची मुख्य व्यवस्था आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी सह्याद्री पट्ट्यातील मुख्य राज्यमार्ग म्हणून कणकवली ते कनेडी मार्गे फोंडा हा रस्ता आहे. कणकवली ते कनेडी हे बारा किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. शाळा, महाविद्यालयापासून सरकारी कामकाजासाठी सातत्याने येणे जाणे नागरिकांचे असते. त्यामुळे या रस्त्यावर दिवस रात्र वर्दळ होती. गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. विरोधी पक्षांकडून अनेकदा आंदोलने ही झाली. अखेर, सार्वजनिक बांधकाम विभागाने कणकवली ते कनेडी या रस्त्याच्या कामासाठी रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला.

सध्या स्थितीत कणकवली शहरातील रेल्वे स्थानकापासून हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायती पर्यंत रस्ता रुंदीकरण झाले आहे. त्या पुढील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. काही वर्षे या परिसरातील नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे अनेक अपघातही झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी यंदा हा रस्ता दर्जेदार करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. त्यानुसार, या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापूर्वी हाती घेण्यात आले. सध्या, हे काम अंतिम टप्प्यात आहे.

आता संपूर्ण रस्त्यावर हॉट मिक्सिंग कार्पेट करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात सिल्कोट मारल्यानंतर हा रस्ता अजूनही गुळगुळीत होणार असून वाहन चालकांना मात्र वाहने सावकाश चालवावी लागणार आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणामुळे दोन वाहनांना सहजासहजी प्रवास करू शकतात असा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाहनांचा वेग ही अमर्यादित आहे. आपल्या वेगावर मर्यादा ठेवून वाहन चालकांना या रस्त्यावरून आता प्रवास करावा लागणार आहे. सध्या स्थितीत रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.