कणकवली आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना पाच महिने पगार नाही..?

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 30, 2023 13:18 PM
views 556  views

कणकवली : ग्रामीण भागातील म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा डोलारा सांभाळणाऱ्या बीएएमएस व बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे यासाठी निधी प्राप्त नसल्याचे सांगण्यात येत असले तरीही पाच पाच महिने हे वैद्यकीय अधिकारी पगाराविना आपले कुटुंब कसे चालवू शकतात? याबाबत आरोग्य यंत्रणेला गांभीर्य नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोविड काळापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरेग्य यंत्रणेचा डोलारा हा बीएएमएस वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहेत. अगदी तत्कालीन कठिण परिस्थितीत या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम केले. त्यानंतर एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यानंतर या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कमी केले जाते. म्हणजे, त्यांना नोकरीबाबतची १०० टक्के शाश्वती नाही. गरजेनुसार त्यांचा आरोग्य यंत्रणा वापर करून घेते.

तसेच या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कधीही इतर कर्मचान्यांप्रमाणे महिन्याचा पगार ठराविक तारखेला मिळतोच असे नाही. जानेवारी महिन्याचा पगार एप्रिलमध्ये, एप्रिलचा ऑगस्टमध्ये अशाप्रकारे आतापर्यंत त्यांना वेळेत पगार अदा करण्यात आल्याचे दिसून येत नाही. आता तर एप्रिल २०२३ पासून २९ बीएएमएस तसेच बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार झालेला नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांचा एखाद्या महिन्यात पगार होण्यास विलंब झाला तर अनेक बैठका, आंदोलनाचे पवित्रे घेतले जातात. कारण त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना नियोजित वेळेत उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आणि संबंधित विभागाची जबाबदारी आहे. मात्र याठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या संबंधित यंत्रणेकडून करण्यात येतात, त्या यंत्रणेकडून चार ते पाच महिने या अधिकाऱ्यांना पगार नसेल तर त्यांनी कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न पडत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निधी उपलब्ध नसल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार झालेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वास्तविक या निधीसाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, तसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाहीत. तसे झाले असते तर ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनासाठी वाट पाहत राहण्याची वेळ आली नसती.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याने अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, चार पाच महिन्यांपासून वेतनच अदा न झाल्याने बीएएमएस व बंधपत्रित एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून नाराजी असून गणेशोत्सवापूर्वी तरी त्यांना वेतन मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.