कणकवली बस स्थानकाला कलर देऊन नवीन दाखवण्याचं काम..?

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 06, 2024 05:36 AM
views 1929  views

कणकवली :  जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारे कणकवली बस स्थानक हे सर्वसामान्य जनतेच्या दळणवळणाचे एकमेव साधन आहे. गेली किती वर्ष या बसस्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामध्ये लाईट फिटिंग तुटलेला असणे, भिंतींना तडे जाणे, रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था नसणे, पाण्याच्या टाकीमध्ये दुर्गंधी या सर्व कारणाने ही बिल्डिंग ग्रासलेली असताना फक्त कलर देऊन नवीन दाखवण्याचे काम एसटी प्रशासन करत आहे. त्यामुळे नेमकं एसटी प्रशासनाला काय दाखवायचे आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांना पडला आहे.

कणकवली बसस्थानकातून दररोज शेकडो एस. टी. गाड्या येजा करतात. साहजिकच दररोज हजारो प्रवाशांची व विद्यार्थ्यांची बसस्थानकात अहोरात्र वर्दळ असते. या बसस्थानकाचा संपूर्ण परिसर खड्डेमय झाले असेल आवार धुळीने माखले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे व चोवीस तास गजबजलेलं बसस्थानक असूनही हे स्थानक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

बसस्थानकाच्या सभोवताली प्रचंड गवत वाढल्याने त्यातून सरपटणारे प्राणी बसस्थानकात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट आहे. साफसफाई नियमित होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्या ठिकाणी असलेले नळ तुटलेल्या अवस्थेत असल्याने दिवसरात्र त्यातून पाणी वाहत असून पाण्याची नासाडी होत आहे. त्याचप्रमाणे बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असूनही त्या ठिकाणी अस्वच्छता आहे. तसेच पिण्याचे पाणी दूषित असल्याचीही माहिती काही प्रवासी व विद्यार्थ्यांनी दिली. परिणामी प्रवाशांना पाणी बाहेरून विकत आणावे लागत आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुंदर व स्वच्छ बस स्थानक अभियानात कणकवली बस स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे त्याप्रमाणे बस स्थानकात तशा घोषणा देण्यात येत आहेत तरीही बस स्थानक परिसरात स्वच्छता दिसून येत आहे. बस स्थानकातील कचरा उचलला जात नसेल तर त्या ठिकाणीच आग लावून विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे एवढ्या समस्यांनी ग्रासलेले हे बस स्थानक रंगून नेमकं एसटी प्रशासनाला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.