
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवस धुंवाधार पाऊस कोसळत आहे. पावसाची रिपरिप असल्याने जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पुरस्थिती प्राप्त झाली आहे. कणकवली - आचरा मुख्य मार्गावर उर्सुला स्कुलनजीक गडनदीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली होती. काही काळ या मार्गावरील वाहतूक बिडवाडीमार्गे वळवण्यात आली. दुपारच्या सुमारास पाणी ओसरले व सदर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. तसेच शिवडाव - परबवाडी येथे पाणी भरल्यामुळे वाहतूक कळसुली - झोपडी मार्गे वळवण्यात आली. कणकवली तालुक्यात भिरवंडे येथील रामेश्वर मंदिराच्या पुढील मोरीवरही पाणी भरले होते.