कळसुलकर इंग्लिश स्कूल - आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचं अनोखं रक्षाबंधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 30, 2023 14:16 PM
views 110  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी आले मध्ये राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनासाठी अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

दर वर्षाप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी कळसुलकर हायस्कूलमध्ये वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने इयत्ता ७वी तील स्काऊटर मयुरेश परब व प्रज्वल पाटोळे यांनी तयार केलेली पर्यावरण पूरक राखी एका वृक्षाला बांधून वृक्ष संवर्धनाचे हित जपले जाते. यावर्षीही प्रशालेतील  राष्ट्रीय हरित सेनेच्या व स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील प्रांगणातील एका वृक्षास राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर यांच्या हस्ते वृक्षाचे औक्षण करून राखी बांधण्यात आली, प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना प्रमुख एस व्ही भुरे, ज्येष्ठ शिक्षक श्री एस एस वैज, चतुर्थ वर्ग कर्मचारी श्री व्ही व्ही केंकरे यांनी वृक्ष संवर्धन काळाची गरज, वृक्षांचे आयुर्वेदातील महत्त्व, पर्यावरण दृष्टीने वृक्ष संवर्धन, वृक्षांचे सजीवांसाठी असलेले फायदे, झाडे लावा झाडे जगवा यांविषयी महत्व पटवून दिले.

यावेळी प्रशालेतील गाईड प्रमुख श्रीम.ज्योती पावसकर, स्काऊट प्रमुख श्री पी बी बागुल,कलाशिक्षक श्री एस व्ही पेडणेकर, सहाय्यक शिक्षिका श्रीम.एस एस चव्हाण तसेच प्रशालेचे चतुर्थ वर्ग कर्मचारी श्री विलास कोंडूरकर विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री एस व्ही भुरे यांनी केले तर प्रास्ताविक श्रीम जे एस पावसकर यांनी केले श्रीम एस एस चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.