कलमठ ग्रा.पं. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 03, 2026 12:24 PM
views 35  views

कणकवली :  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2024 - 25 या स्पर्धेत कणकवली तालुक्यात कलमठ ग्रामपंचायत प्रथम आली आहे.  तालुक्यात उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल ही निवड झाली आहे. 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलमठ गावामध्ये स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संरक्षण, हगणदारीमुक्त गाव, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा यावर भर, ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती, आजारांचे प्रमाण कमी करून आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे, तसेच घरगुती व सार्वजनिक शौचालयांचा वापर, ओला व सुका कचरा वेगळा करून व्यवस्थापन गावातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पाणी साठ्यांची स्वच्छता व संरक्षण, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन यासारखे विविध उपक्रम सरपंच संदीप मेस्त्री ,उपसरपंच  ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व सहकार्‍यांच्या सहकार्याने राबवण्यात आले. त्यामुळे कलमठ ग्रामपंचायत या अभियानात प्रथम आली आहे.

कलमठ ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले. त्यावेळी सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि गावातील ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला. एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून आम्ही काम करत असताना नागरिकांच मोठं सहकार्य लाभत आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2024- 25 मध्ये कलमठ ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम आल्याने अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिली.