एकमुखी दत्त मंदिराचा २ एप्रिलला कलशारोहण सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 17:54 PM
views 22  views

 सावंतवाडी : सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर येथे येत्या गुरुवारी २ एप्रिल २०२६ चैत्र शुद्ध पौर्णिमाला भव्य 'कलशारोहण सोहळा' आयोजित करण्यात आला आहे. देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीतर्फे या निमित्ताने ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी दिली. या मंदिरपूर्ततेसाठी हातभार लावणाऱ्या दात्यांसह परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. गवस म्हणाले, प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या कृपेने आम्ही हे मंदिर पूर्ण करू शकलो. मंदिराचे काम पूर्ण झालं असून 'कलशारोहण सोहळा' आयोजित करण्यात आला आहे.‌ या सोहळ्याला सोमवार, दि. ३० मार्च रोजी सायं. ४ वाजता भव्य कलश दिंडीने प्रारंभ होणार असून ही दिंडी मराठी शाळा क्र. ४ पासून सुरू होऊन शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत सबनिसवाडा येथील मंदिरात रात्री आरतीने समाप्त होईल. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वा. शांतिपाठ पठन, प्रायाश्चित विधी, त्यानंतर गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राध्द आचार्यदि वरणं आदी होणार असून ९ ते १ दरम्यान प्राकारशुद्धि, देवतांचे आवाहन, पूजन, श्रींची आरती, दुपारी महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. सौ. मंजिरी धोपेश्वरकर यांचा 'भक्तीरंग' व रात्री ८.३० वा. निलेश मेस्त्री प्रस्तुत 'हे सुरांनो चंद्र व्हा' हा नाट्यसंगीत व अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच १ एप्रिल रोजी सकाळी पवमान अभिषेक व होमहवन पार पडेल. ९ वा. तुलीशपूजा होणार असून भाविकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी योगेश सावंत भोसले यांचा 'स्वरसाद' आणि रात्री किरण सिद्धये संचलित 'स्वरधारा' हा संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच कलशारोहण सोहळा गुरुवार २ एप्रिल रोजी पार पडेल. सकाळी देवता पूजन, हवन, शतकलशार्चन, शतकलाभिषेक, देवतांवर अभिषेक होणार असून दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा संपन्न होईल. यावेळी अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी), प.पू. शरद जोशी महाराज (पुणे) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कलशपूजन व कलशारोहण होणार आहे. दुपारी आरती व महाप्रसाद होणार असून ह.भ.प. स्नेहलदिप प्रभाकर सामंत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर श्रींची पालखी आणि रात्री 'नादब्रह्म' हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. या सुवर्ण सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे,‌ सदस्य दीपक पटेकर, जितेंद्र पंडित, लतिका सिंग, विनायक परडाकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत आदींनी केले आहे.