मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा : राजन तेली

श्री देव महापुरुष कला-क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन !
Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 10:31 AM
views 124  views

सावंतवाडी : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. मात्र, मुलांनी खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य व बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. निरवडे गावात श्री देव महापुरुष कला-क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढे सुद्धा त्यांनी आपले काम सुरू ठेवावे असेही त्यांनी त्यावेळी सांगितले. निरवडे येथे सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनच्या मान्यतेने आणि सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कलाक्रीडा मंडळ माळकरवाडी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री  तेली यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.


 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ठाकरे, उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, ॲड. अनिल निरवडेकर, माजी सरपंच प्रमोद गावडे, सदा गावडे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, सागर नाणोसकर, न्हावेली सरपंच अंकित धाऊसकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, शैलेश नाईक, सुधीर राऊळ  भगवान गावडे, गजानन नाटेकर, श्री. रेडकर, बाबुराव गावडे, मधुसूदन गावडे, नयनेश गावडे, सुहास गावडे, लाडू गावडे, नामदेव गावडे, महेंद्र गावडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

          

यावेळी बोलताना श्री. तेली पुढे म्हणाले, या ठिकाणच्या युवक युवतींना खेळण्याच्या संधी उपलब्ध होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळून युवकांनी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. २०`४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यावेळी अशा विविध खेळांना महत्त्व प्राप्त होण्यासाठी अनेक खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता सुद्धा नमो चषकाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. निरवडे सारख्या भागात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचे धाडस श्री देव महापुरुष कला-क्रीडा मंडळ निरवडे माळकरवाडी यांनी केले. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी यापुढे सुद्धा आपले कार्य सुरूच ठेवावे असेही त्यांनी सांगितले.


श्री. दळवी म्हणाले, श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळांनी कबड्डी स्पर्धेचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. ज्या संघाने स्पर्धेत भाग घेतला आहे त्यांनी कसोटीने आणि हुशारीने खेळ खेळला पाहिजे आणि आपले कौशल्य दाखविले पाहिजे. अशा स्पर्धा आयोजित करून जिल्ह्यातील खेळाडूंना संधी प्राप्त करून मंडळाने चांगले काम केले आहे त्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो असे त्यांनी सांगितले. श्री निरवडेकर म्हणाले, निरवडे सारख्या माझ्या गावात अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात याचा मला आनंद आहे. यापुढे सुद्धा अशाच प्रकारे विविध स्पर्धा आरोग्य विषयक शिबिर आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवावे त्यासाठी लागणारी मदत आम्ही निश्चितच करू असे त्यांनी सांगितले.

         

यावेळी कासार म्हणाले, श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी यापुढे सुद्धा अशाच प्रकारे विविध सामाजिक उपक्रमासह मैदानी खेळ आयोजित करून स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने निरवडे गावातील कबड्डी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यात प्रसाद पवार, कौस्तुभ कोनाळकर, आणि मयुरेश जामदार यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि चिन्मय सावंत यांनी केले.