
सिंधुदुर्गनगरी : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी नियुक्त समितीची बैठक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्र आढावा घेण्यात आला.
सिंधुदुर्गातील पत्रकार भवनात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार, सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरी पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, समितीचे उपसचिव विजय पवार, यांचेसह दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आदि उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संपूर्ण विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये जिल्ह्यात तपासण्यात आलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळून आलेल्या नोंदीबाबतची माहिती दिली. तपासलेल्या अभिलेख प्रकारामध्ये मुख्यतः जन्म मृत्यूच्या नोंदी व शैक्षणिक अभिलेख्यांमध्ये कुणबी, कुणबी -मराठा, मराठा-कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
त्यानंतर समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भूमि अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, कारागृह विभाग यासह विविध विभागांकडील नोंदीबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी तसेच मोडी लिपीतील नोंदीबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले