परशुराम घाटातील गॅबीयन वॉलसाठी १५ जूनची 'डेडलाईन'

Edited by:
Published on: May 11, 2025 18:43 PM
views 90  views

चिपळूण : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात दरडी कोसळण्याच्या संभव अधिक असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच दरडीच्याखालच्या बाजूने गॅबीयन्वॉल उभारण्याचे काम येत्या १५ जूनपर्यंत मार्गी लावण्याचे 'टार्गेट' संबंधित ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने ठेवले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षे रेंगाळले असून विविध टप्प्यावरची कामे रखडली आहेत. त्यात कोकणातील महत्वाच्या परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने  ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत.

याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे. आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जातं आहे. या कामामुळे रस्त्यावर येणारी माती आणि भलेमोठे भोका काडीअंशी कमी होईल. लोखंडी जाळी येत्या काही दिवसांत हे कामही पूर्णत्वास नेले जाईल. त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आठ ड्रील मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे. उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे. तीन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयन वॉल उभारण्याचे काम देखील जोशात सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या  सहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

गॅबीयन वॉलच्या माध्यमातून मजबुतीकरणाचे अर्धे काम हे पूर्ण झाले आहे. अजून काही दिवसांत हेही काम पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयन वॉल हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे.