LIVE UPDATES

महायुतीला दिलासा ; जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 03, 2026 15:15 PM
views 138  views

रत्नागिरी : विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील महायुतीमध्ये झालेली बंडखोरी आज शमली. शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या व अपक्ष बंडखोर उमेदवार जुईली दळवी – जुईकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे कमी मतदार बाजूने असताना महाविकास आघाडीसमोर जिंकण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जुईली दळवी यांनी बंडखोरी केल्याने महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले. खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी महायुतीकडून अर्ज भरला. पण दळवी यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. वरिष्ठ पातळीवरील यशस्वी मनधरणीनंतर ही बंडखोरी थंड करण्यात यश आले आहे.

आज अर्ज मागे घेण्यासाठी स्वतः उमेदवार जुईली दळवी – जुईकर या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सूचकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकृतपणे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीच्या वेळी महायुतीचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

विकास गोगावले यांच्या उपस्थितीमुळे ही बंडखोरी मागे घेण्यात महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि विशेषतः शिंदे गटाने पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. जुईली दळवी यांनी माघार घेतल्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील महायुतीचा मार्ग आता अधिक सुकर झाला असून, राजकीय वर्तुळात या नाट्यमय माघारीची जोरदार चर्चा सुरू आहे.