निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करा !

सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार अरुण उंडे यांचं प्रतिपादन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2023 16:41 PM
views 169  views

सावंतवाडी : ब्रिटिश राजवटीला न जुमानता समाज प्रबोधन करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकरांमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारीतेची मुहूर्तमेढ रोवली, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने समाजातील वास्तव मांडले, आजच्या पत्रकारांनीही समाजातील वास्तव मांडून निर्भीड पत्रकारितेतून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा, असे आवाहन सावंतवाडीचे प्रभारी तहसीलदार अरुण उंडे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने शुक्रवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उंडे बोलत होते. 

यावेळी सावंतवाडी पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब, उपाध्यक्ष अनंत जाधव उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. 

प्रभारी तहसिलदार उंडे पुढे म्हणाले, पन्नास वर्षापुर्वी या देशात ब्रिटीशांची जुलमी राजवट सुरु होती, मात्र त्यांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात बाळशास्त्री जांभेकर यांनी आवाज उठवत आपल्या दपर्ण या दैनिकातून समाज प्रबोधनाचे काम केले. त्यांनी सामाजिक परिस्थिती जाणून समाज्यातील अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे काम केले, त्यांनी निर्भीड आणि निस्वार्थ भावनेने वास्तव मांडले. आजही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराकडून आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन होत आहे, ते अधिकाधिक अजून धारधार व्हावे.

मेगडे म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जगासमोर आणला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जागवली. जांभेकर यांनी जो पायंडा घालून दिला तो आजही इथला पत्रकार जपत आहे. 

 घारे परब म्हणाल्या, इंग्रजांच्या काळात दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी  इंग्रजांच्या जुलमी राजवटीला समाजासमोर आणले. एक अभ्यासू  व्यक्तिमत्व असलेल्या जांभेकर यांचे मराठी भाषेवरही चांगले प्रभुत्व होते. आज त्यांचाच वारसा पुढे घेऊन समाजातील पत्रकार अन्याय अत्याचारावर वाचा पडत आहेत. चांगला समाज घडवण्याचे काम पत्रकारांच्या हातून घडत आहे. भविष्यात त्यांचे हे काम अधिक वाढत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला जिल्हा प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत खानोलकर सचिव राकेश परब, खजिनदार संदेश पाटील, दिव्या वायंगणकर, रुपेश हिराप, विश्वनाथ नाईक, मदन मुरकर आदी उपस्थित होते.