
सावंतवाडी : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजाच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांचे सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकदा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, समाजाचे आरोग्य जपताना त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी नॅबच्या माध्यमातून सावंतवाडीत लवकरच नेत्र तपासणी व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल, असे सांगून त्यांनी पत्रकारांना यासाठी जनजागृती करण्याची विनंती केली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. प्रमोद भागवत यांनी रोटरी क्लबमार्फत सावंतवाडीत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर फिजिओथेरपी सेंटर देखील सुरू असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांना याचा लाभ मिळावा यासाठी पत्रकारांनी जनजागृती करावी आणि रोटरी क्लब पत्रकारांच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक यांनीही पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असून, मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार संघ यासाठी नेहमीच कार्यरत असल्याचे सांगितले.
या शिबिरात सहभागी झालेल्यांना सामान्य तपासणी, रक्तदाब मोजणी, ईसीजी (ECG) तपासणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, हिंद लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणीची सुविधाही पुरवण्यात आली, ज्यामुळे विविध आजारांचे निदान वेळेत होण्यास मदत झाली. एकूण २५ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात डॉ. प्रकाश घोगळे (किडनी विकार तज्ञ), डॉ. ऐश्वर्या जगताप (दंत रोग तज्ञ), डॉ. सुधीर सांभारे (त्वचा रोग तथा अस्थिरोग तज्ञ), डॉ. सुयश सोनावणे (एमबीबीएस) आणि डॉ. पवन (एमबीबीएस) यांच्यासह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. सिंधू मित्र संस्थेचे संचालक भगवान रेडकर यांनी विशेष सहकार्य केले. ऑन कॉल रक्तदाता संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनीही शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील तर आभार सचिव विजय राऊत यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर व सदस्य दीपक गावकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष रो. प्रमोद भागवत, नॅबचे अध्यक्ष अनंत उचगांवकर, माजी सचिव दिलीप म्हापसेकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, सोशल मिडीया जिल्हाधक्ष अमोल टेंबकर,
पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, हरिश्चंद्र पवार, सचिव विजय राऊत, उपाध्यक्ष मोहन जाधव,दिव्या वायंगणकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सदस्य राजू तावडे, रमेश बोंद्रे, दीपक गावकर, नागेश पाटील, अनुजा कुडतरकर, पत्रकार रुपेश हिराप, प्रा. रुपेश पाटील, निखील माळकर, जतिन भिसे, रविंद्र तावडे, भुवन नाईक आदींसह पत्रकार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.