पत्रकारिताच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे प्रभावी माध्यम

ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल दळवी यांचं प्रतिपादन
Edited by: संदीप देसाई
Published on: January 07, 2024 13:17 PM
views 54  views

दोडामार्ग : कोकणने अनेक प्रतिभावंत माणसे देशाला, जगाला दिली आहेत. त्यापैकीच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे एक व्यक्तिमत्व होय. पत्रकारिता क्षेत्रात 20-25 वर्षांपूर्वी अनेक अडचणी यायच्या. बातम्या संकलन करणे, फोटो काढणे, त्या मुख्य कार्यालयात पाठवणे यात पत्रकारांना तारेवरची कसरत करावी लागायची. मात्र आता काळ बदलला आहे. आता बातम्या पाठविणे जरी सोपे झालं असलं तरी पत्रकारांवर अनेक कठीण प्रसंग हे येतच असतात. म्हणून जे न्याय तत्त्वाला धरून असते, सत्य असते ते छापणे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे लिखाण म्हणजेच खरी पत्रकारिता होय असे प्रतिपादन ज्येष्ठ व दोडामार्ग पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठल दळवी यांनी केले.

       दोडामार्ग तालुका पत्रकार समितीचा यावर्षीचा पत्रकार दिन कळणे येथील नूतन विद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, विठ्ठल दळवी यांसह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने  पत्रकार दिन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.  यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल दळवी,  दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संदीप देसाई,  मुख्याध्यापक महेंद्र देसाई, पत्रकार समिती सचिव गणपत डांगी, माजी पत्रकार तथा कॉलनीतील सहाय्यक लिपिक भरत दळवी, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ उपस्थित होते.

        यावेळी विठ्ठल दळवी यांनी 25 वर्षांपूर्वी पत्रकारितेतील किस्से सांगताना अनेक आठवणीना उजाळा दिला. आज पत्रकारितेचे स्वरूप विस्तारत असताना मात्र पत्रकारांनी अधिक सजग होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर समितीचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी  आजच्या पत्रकारितेवर भाष्य केलं. आज काळ जसा पुढे जातीय तस पत्रकारिता क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. पूर्वी आपण जी बातमी मिळविण्यासाठी धडपड करायचो आज ती स्थिती राहिलेली नाही. आज बातम्या हजार आहेत पण त्या सत्य आणि वास्तववादी किती आहेत, कॉपी, पेस्ट आणि फॉरवड किती आहेत याचा बारकाईने अभ्यास करून आपली विश्वासार्हता जपणे हे मोठ आव्हान पत्रकारांसमोर आहे. पूर्वी बातमीसाठी फोटो काढणे, सिलेक्सन करणे आणि तो प्रिंट करण्यासाठी आणि मुख्य कार्यालयात पाठविण्यासाठी मग एस.टि. बसेसची वाट पाहणे हे सगळ कालबाह्य झालं आहे. बातम्या लिहून पाठविणे आणि त्या टाईप , दिटीपी करण हे सारं काही कालबाह्य झालं आहे. पत्रकारिता आणि मीडिया कमालीचा अपडेट झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांनी स्वतः अपडेत होणे आवश्यक आहे. फक्त प्रिंट मध्ये बातमी लिहिणारे पत्रकार हे सांगण्याचे दिवसही आता संपले आहेत. कारण प्रिंट बरोबर पत्रकारिता करण्यासाठी आज अनेक चॅनल, प्रादेशिक वृत्त वाहिन्या, जिल्हा स्तरावरील चॅनल, युट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ब्लॉक, नव्हे तर आज डिजिटल माध्यमातून अनेक समाज मध्यामावर पत्रकारिता करण्याची कवाडे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे आपण गेली अनेक वर्षे जे बाळशास्त्रींचा वारसा पुढे नेत आहोत, पत्रकारिता करत आहोत त्यांनी अधिक सजक, व्यापक आणि अपडेट होणे आवश्यक आहे. पत्रकारिता हा जरी पेशा असला तरी येथेही आता व्यवसायिता आली आहे. कागदांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती आणि व्यवस्थापनावर होणार मोठा खर्च त्यामुळे प्रिंट मीडिया चालविणे हे सहज सोप राहिलेलं नाही. मात्र या सगळ्या गोष्टीत आपण आपलं मुळ विसरता नये. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेताना आपण लोकशाहीचा महत्वाचा घटक म्हणून आपला सच्चेपणा आणि विश्वासार्हता जपलीच पाहिजे अशी अपेक्षा संदीप देसाई यांनी व्यक्त केली.

तर कळणे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक  प्रशांत राऊळ यांनीही मनोगत व्यक्त केलं, ते म्हणाले जगात अनेक शस्त्र आहेत. पण शब्द हे समाजातील मानसिकता बदलणारे प्रभावी शस्त्र आहे. पत्रकारितेचे महत्वपूर्ण योगदान स्वातंत्र्यपूर्व काळात व आताच्या काळातही आहे. पत्रकार हा भविष्यकाळाचा वेध घेतो. ते जबाबदारीची भुमिका बजावत असतात. त्यामुळे समाजाला पत्रकारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि येथील पत्रकारही ते समर्थपणे पेलत आहेत, असे ते म्हणाले. पत्रकार दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप देसाई यांनी, सूत्रसंचालन  तेजस देसाई यांनी केलं. आभार गणपत डांगी यांनी मानले.