पत्रकार सुनील तांबे यांची सिंधुदुर्गात व्याख्याने..!

आज सावंतवाडीत व्याख्यान
Edited by:
Published on: May 02, 2024 07:44 AM
views 147  views

सुनील तांबे यांचा परिचय असा -

दै. मराठवाडा या छोट्या वर्तमानपत्रात ते मुंबईचा वार्ताहर म्हणून काम करू लागले. यथावकाश ते इंग्रजी पत्रकारितेत गेले. डेक्कन हेराल्ड या कर्नाटकातील नामवंत दैनिकात ते मुंबई प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. गुजरातमधील राजकीय वृत्तांकनाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर काही काळ ते मुंबई दूरदर्शनसाठी बातमीपत्र सादर करत होते. पुढे रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेत कमोडिटी करस्पाँडट म्हणून रुजू झाले. एका वर्षात म्हणजे २००७ साली रॉयटर्स मार्केट लाइट या वृत्तसेवेचे ते संपादक झाले. २०१४ सालापर्यंत ते रॉयटर्समध्ये होते. त्यानंतर ते मुक्त पत्रकारिता करू लागले. 

केरळ पासून काश्मीर आणि कच्छपासून नागालँण्ड असा उभा-आडवा भारत ते वृत्तांकनासाठी हिंडले आहेत. राजकीय आणि आर्थिक घडामोडींचं, विशेषतः शेतमालाच्या बाजापेठेचं त्यांनी वृत्तांकन केलं आहे. गॅब्रिएल गार्सिया मार्खेज या नोबेल पुरस्कार विजेत्या लेखकाच्या साहित्याचा आणि जीवनाचा परिचय करून देणारं त्यांचं पुस्तक -- मार्खेजची गोष्ट, लोकवाङमय प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. 

रविश कुमार यांच्या फ्री व्हॉईस या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला आहे. ट्वेंटी वन लेसन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे युवाल नोहा हरारी यांचं पुस्तक जगात गाजलं आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनील तांबे यांनी केला. युवाल नोहा हरारी मुंबईला आले होते त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी सुनील तांबे यांना मिळाली. 

द होम इन द वर्ल्ड या अमर्त्य सेन यांच्या संस्मरणाचा मराठी अनुवाद ते करत आहेत.  बॅ. नाथ पै सेवांगण आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत सुनील तांबे यांची "भारतीय लोकशाही पुढील आव्हाने" या विषयावर बुधवार दिनांक १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता बॅ. नाथ पै  सेवांगण मालवण येथे व गुरुवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे विशेष व्याख्याने आयोजित केलेली आहेत. सर्व श्रोत्यांनी या व्याख्यानांना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.