पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळेत विशेष नागरी सन्मान

Edited by:
Published on: March 24, 2025 19:49 PM
views 211  views

दोडामार्ग  : दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून  राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महामंडळाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या पत्रकार सुहास देसाई यांचा पिकुळे हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबई हितवर्धक मंडळाच्या वतीने विशेष नागरी सन्मान करण्यात आला.

पिकुळे हायस्कुल मध्ये कानिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुहास देसाई यांनी प्रशाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लावलेला हातभार, शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून केलेली भरीव कामगिरी तसेच पत्रकारिता क्षेत्र, नेहरू युवा केंद्राचे माध्यमातून अनेक मंडळ स्थापन करून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा चळवळ उभारणे,  तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित पुनर्वसन गावच्या धरणग्रस्त समिती स्थापन करून भरीव योगदान मिळवून देणे, सहकार क्षेत्रात कर्मचारी पतसंस्था, तसेच अन्य संस्थात पदाधिकारी म्हणून काम केले आहे यामध्ये गेली पंचवीस वर्षे श्री. देसाई कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडीत होण्यासाठी पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावण्यात पुढाकार घेतला.

त्यांच्या या सामाजिक सेवा, सहकार, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात योगदान बद्दल पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई संस्था यांनी शाळा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम मध्ये समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर,  कोकणसादचे संपादक संदीप देसाई, माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. यावेळी पिकुळे मुंबई हितवर्तक मंडळाचे अध्यक्ष बबन गवस, सचिव प्रमोद गवस, हायस्कुलचे मुख्याध्यापक अशोक आंबूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.