रोजीरोटीच्या प्रश्नासाठी लाँगमार्च मध्ये सहभागी व्हा | आडाळी एमआयडिसी दशक्रोषीतील सरपंचांचे आवाहन

२० ऑगस्टला आडाळी ते बांदा ८ किलोमीटरचा लक्षवेधी ‘लाँगमार्च’
Edited by: संदीप देसाई
Published on: August 16, 2023 19:57 PM
views 109  views

दोडामार्ग : आडाळीत एमआयडीसीला मंजुरी मिळून १० वर्षे झाली तरी अद्याप त्या ठिकाणी उद्योगांचा पत्ताच नसल्याने आडाळी दशक्रोषीतील सरपंच आणि येथील कृती समिती आक्रमक झाली असून येत्या २० ऑगस्टला आडाळी ते बांदा असा ८ किलोमीटरचा लक्षवेधी ‘लाँगमार्च’ काढण्यात येणार आहे. हा लाँगमार्च बांद्यापर्यंत असला तरी तो मंत्रालयावरील प्रतिकात्मक असल्याची माहिती आडाळी सरपंच पराग गावकर व दशक्रोशीतील सरपंच यांनी एकत्रित येत दिली आहे. स्वतःच्या रोजीरोटीचा प्रश्न समजून या लाँगमार्चला युवकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन या दशक्रोशीतील सरपंचांनी केले आहे. 

दोडामार्ग मधील स्नेह रेसीडेन्सी हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दशक्रोशितून एकवटलेले सरपंच बोलत होते. यावेळी आडाळी सरपंच पराग गावकर, मोरगाव सरपंच संतोष आईर, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, सासोली सरपंच बळीराम शेटये, कुंब्रल उपसरपंच अमित सावंत, कळणे सरपंच अजित देसाई यांसह प्रवीण गावकर उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत पराग गावकर यांनी एकूणच गेल्या दहा वर्षांचा एमआयडीसी प्रकल्पाचा आढावा मांडला, ते म्हणाले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे २०१३ मध्ये आडाळी येथे ७२० एकर क्षेत्रात महाराष्ट्र औद्यागिक क्षेत्र मंजूर झाले. यावेळी स्थानिकांनी कोणताही विरोध न दर्शवता वर्षभरातच जमिनीचे हस्तांतरण ओद्योगिक महामंडळाकडे करून दिले. पण महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे अपेक्षेप्रमाणे वाटप उद्योजकांना झालेले नाही. आणि ज्यांना वाटप झाले त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. यासाठी आडाळी स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती आणि 'घुंगुरकाठी' संचलित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समितीच्यावतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तथापि, एक दशक संपले तरी औद्योगिक क्षेत्र गती घेण्याची कोणतीच चिन्हे नसल्याने या विषयाकडे शासनाचे आणि सर्व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठीच या ‘लाँगमार्च'चे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प झाल्यास एकट्या आडाळी गावाचा नव्हे तर संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा कायापालट होईल. किमान ५ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे जलद गतीने हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

आडाळी एमआयडीसी सध्या वीज, पाणी, रस्ते, स्ट्रीटलाईट आदी सुविधांनी परिपूर्ण आहे. गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळही २० किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे स्थानिक उद्योजकांसोबत मुंबई, पुणे, दिल्ली येथील उद्योजकही आडाळीत उद्योगधंदे उभारण्यास इच्छुक आहेत. मात्र MIDC आणि राज्यशासन भूखंड खुले करून वितरीत करण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे हे एमआयडीसी क्षेत्र कार्यान्वीत होत नसल्याचे मत गावकर यांनी व्यक्त केलंय.

एमआयडीसीच्या मूळ उद्देशाला फासला जातोय हरताळ....

कृती समितीने बराच पाठपुरावा केल्यावर महामंडळाने जानेवारी २०२३ मध्ये भूखंड वितरणासाठी जाहिरात प्रसिद्धीला दिली. यासाठी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले. त्यांच्या मुलाखतीही पार पडल्या. मात्र अनाकलनीय कारणामुळे भूखंड वाटप झालेले नाही. येथे मंजूर असलेल्या सुमारे २०० कोटीच्या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प (आयुष) ला जागा देऊन आज तीन वर्षे झाली, तरी प्रकल्पाची पायाभरणीही झालेली नाही. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील किमान पाच हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, एवढे उद्योग आज आडाळीत येण्यास तयार आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी आणि शासन यांना स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांची मंत्रालयात भेट घेऊन आडाळी एमआयडीसी संदर्भात निवेदन दिले. त्यांना उद्योग परिषदा घ्या असेही सांगितले. पण म्हणावा तसा प्रतिसाद त्यांच्याकडूनही मिळाला नाही, त्यामुळे विना तक्रार ज्या भूमी पुत्रांनी आपल्या तरुणांना रोजगार मिळेल या उद्देशाने जमिनी दिल्यात त्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना भूमिपुत्रात निर्माण होत आहे.


लाँगमार्च पक्ष विरहित... मात्र सर्व पक्षियांना सहभागाचे आवाहन...

२० ऑगस्टला होणारा लाँगमार्च हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसून केवळ औद्योगिक क्षेत्राचा विकास या एकाच मुद्यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरपंच, ग्रामस्थ व कृती समितीने हा आयोजित केला आहे. आडाळी एमआयडीसी प्रवेशद्वार येथून सकाळी साडेनऊ वाजता या लाँगमार्चला सुरुवात होणार आहे. लोकशाही मार्गाने हा लाँगमार्च काढण्यात येईल. यावेळी मोरगाव, डेगवे, पानवळ मार्गे बांदा महामार्ग सर्कल येथे सुमारे दोन तासांत पोहोचेल. तेथे कॉर्नर सभा घेऊन मार्चची सांगता होईल. मात्र या लाँग मार्च ला सर्व पक्षीय मंडळीनी पाठिंबा द्यावा व दोडामार्गात रोजगार निर्मिती या जिव्हाळ्याच्या प्रश्न सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच तालुक्यातील युवा वर्गाने बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने पराग गावकर यांनी केले आहे.