
सावंतवाडी : अनेक विद्यार्थी आपले उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. बहुसंख्य विद्यार्थी हे शासकीय, निमशासकीय सेवेसोबतच नामांकित खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रयत्नशील असतात. परंतु यासोबतच विदेशात देखील अनेक चांगल्या नोकऱ्या उपलब्ध असतात हे त्यांना माहित नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशातील करिअर संधींची माहिती मिळावी, तेथील नोकऱ्यांबाबतच्या सर्व शंकांचे निरसन व्हावे या हेतूने यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत 'जर्मनीतील नोकरीच्या संधी' या मार्गदर्शन सत्राचे आयोजन शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वा. करण्यात आले आहे.
हे सत्र तृतीय वर्ष मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले असून यामध्ये त्यांच्या पालकांचा सहभाग असणेही अपेक्षित आहे. यावेळी मूळचे महाराष्ट्रीयन व गेली सोळा वर्षे जर्मनीमध्ये राहणारे मॅट्रिक्स स्ट्रक्चर्सचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार कलवडे व त्यांची टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. सोबतच थेट जर्मनीतून काही कंपन्यांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. मार्गदर्शन सत्रानंतर विद्यार्थी व पालकांशी प्रश्नोत्तराची वेळही राखून ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाला यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे.