झिलू गोसावी यांचा गोव्यात खास सन्मान

Edited by:
Published on: May 25, 2025 16:47 PM
views 28  views

सावंतवाडी : वेंगुर्ला येथील अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे निर्माते झिलू गोसावी यांचा गोवा राज्यातील प्रसिद्ध ब्रह्मा करमळी, सत्तरी येथे गौरव करण्यात आला. गोव्याचे नामवंत शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते ब्रह्मा करमळी सत्तरी येथील श्री शांतादुर्गा देवस्थानाच्या वर्धापन दिनानिमित्त हा सत्कार सोहळा पार पडला. श्री. गोसावी यांनी आजवर २५० दशावतारी नाटकांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना ॲड. शिवाजी देसाई यांनी 'दशावतार' या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, दशावतार म्हणजे भगवान विष्णूंचे दहा अवतार असून, दशावतारी नाट्यकलेच्या माध्यमातून विष्णूंच्या विविध अवतारांतून निर्माण झालेल्या घटनांचे आध्यात्मिक प्रगटीकरण आणि प्रबोधन होत असते. दशावतारी नाट्यकला ही कोकण, महाराष्ट्र आणि गोव्याची उज्ज्वल हिंदू संस्कृती दर्शवणारी परंपरा आहे. या कलेतून आध्यात्मिक उन्नती साधणे आवश्यक असून, आज ही नाट्यपरंपरा टिकवणे गरजेचे आहे.

ॲड. देसाई यांनी दशावतारी कलाकारांच्या स्थितीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अनेक दशावतारी कलाकार तुटपुंज्या मानधनावर ही नाट्यकला जोपासत आहेत. या कलेला संपूर्ण कोकणपट्टीत राजमान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये दशावतारी नाटक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तसेच, राज्य पातळीवर ही कला कलाकारांना सादर करण्यासाठी सरकारने अनुदान आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. दशावतारी नाट्यकलेमुळे आध्यात्मिक जागरण होत असते आणि या कलाकारांना नेहमी सन्मानाने पाहिले पाहिजे. ही कला खूप कठीण आहे, असेही ॲड. शिवाजी देसाई शेवटी म्हणाले.

या गौरवाला उत्तर देताना झिलू गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, दशावतारी नाट्य कलाकारांचा गौरव क्वचितच होत असतो. या नाट्यकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि ही कला मोठी व्हायला पाहिजे. आज झालेल्या गौरवाने आपले मन खूप भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दशावतारी नाट्य प्रयोग करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

ॲड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन दशावतारी नाट्यनिर्माते झिलू गोसावी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जयसिंग देसाई, रामराव देसाई, अरविंद देसाई यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, म्हापण, वेंगुर्ले यांच्यातर्फे "कली आणि मच्छिंद्रनाथ चे युद्ध" हा दशावतारी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगात महेश गोसावी, संजय गोसावी, मिलींद नाईक, विनोद राणे, महादेव नाईक, प्रसाद (बाबू) जबडे, पांडुरंग पालकर, सचिन कुंभार, बबलू पालकर, ओंकार गोसावी, दिनेश मांजरेकर, बालकलाकार मिहीर गोसावी, विनोद राणे, झिलू गोसावी, महेश गोसावी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयसिंग देसाई यांनी केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.