
चिपळूण : जिजाऊ ब्रिगेडच्या उपशहर अध्यक्ष स्मिता खंडारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिवरे गावात एक आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शेतकरी महिलांना छत्री वाटप करण्यात आले तसेच भातलावणी कार्यक्रम राबवून ग्रामीण महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला.
जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी स्वतः भातलावणीचा अनुभव घेत या उपक्रमात सहभाग नोंदवला. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तिवरे गावातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, गरजा व आत्मनिर्भरतेचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. गावकऱ्यांनीही यावेळी ब्रिगेडच्या महिलांचे भरभरून स्वागत केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाशी नाळ जपण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न जिजाऊ ब्रिगेडने केला. महिलांनी शेतकरी महिलांच्या खांद्याला खांदा लावत भातलावणी करत एक वेगळा अनुभव घेतला.
कार्यक्रमाला माजी कोकण विभागीय उपाध्यक्ष व मार्गदर्शिका मालतीताई पवार, कोकण-मुंबई विभागीय कार्याध्यक्ष व मार्गदर्शिका निर्मलाताई जाधव, तालुकाध्यक्ष मीनलताई गुरव, अनामिका हरद्वारे, खजिनदार अपूर्वा गायकवाड, रवीनाताई गुजर, नंदाताई भालेकर, माजी उपतालुकाध्यक्ष प्राजक्ताताई सरफरे, माजी खजिनदार माधवी भागवत, शहराध्यक्ष वर्षाताई खटके, उपशहराध्यक्ष स्मिता खंडारे, शहर सचिव संध्या घाडगे, पूजाताई सुर्वे, उपतालुका अध्यक्ष वीणाताई जावकर, मनोरमाताई पाटील यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती.
गावकऱ्यांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत जिजाऊ ब्रिगेडचे आभार मानले. महिलांच्या सहभागातून आणि प्रेरणादायी उपक्रमांतून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून, हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण ठरला.