जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य न होणारे : प्राचार्य अनिल सामंत

Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2025 12:43 PM
views 61  views

शिरोडा : चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी  जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.


आरवली (सिंधुदुर्ग) या दळवींच्या जन्मगावी आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या अठ्ठावन्नाव्या मासिक कार्यक्रमांतर्गत शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय व दळवी कुटुंबीयांच्या सहयोगाने आयोजित या सोहळ्यास कै.जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी,’संगीत देवबाभळी’ या नाटकाचे लेखक तथा दिग्दर्शक प्राजक्त देशमुख व गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.


नेहमीच्या पद्धतीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन कै.दळवी यांचा जीवनपट अनोख्या पद्धतीने उलगडणारे वैविध्यपूर्ण कार्यक्रम या सोहळ्यात सादर करण्यात आले.


दळवींच्या साहित्यात आलेल्या त्यांच्या घरातील वस्तू,आरवली परिसरातील वास्तू,तसेच व्यक्ती यांचा मागोवा घेणारा राजेश नाईक निर्मित ‘पाऊलखुणा’ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने सादर करण्यात आला.


विनय सौदागर दिग्दर्शित ‘दळवींचे साहित्य चरित्र’ या दळवींच्या साहित्याचा अभिवाचन व अभिनयाच्या माध्यमातून वेध घेणाऱ्या कार्यक्रमात उमा प्रभुदेसाई (गोवा) नीला इनामदार (अमेरिका) व स्थानिक कलाकार रवींद्र पणशीकर यांनी दळवींच्या विविध नाटकांमधील व्यक्तिरेखा सुरेखरितीने सादर केल्या. तसेच सरोज रेडकर, सोमा गावडे, स्नेहा नारिंगणेकर, वैभवी राय शिरोडकर, डॉ. गणेश मर्ढेकर,आसावरी भिडे, काशिनाथ मेस्त्री या स्थानिक वाचकांनी दळवींच्या विविध पुस्तकांमधील निवडक भागांचे अभिवाचन केले.


‘आप्तेष्टांशी हितगुज’ या कार्यक्रमात दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी व स्नुषा आदिती दळवी यांच्या सोनाली परब यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून दळवी हे वडील व सासरे म्हणून किती विशाल मनाचे होते याची प्रचीती उपस्थित रसिकांना आली.


‘सन्मित्र जयवंताचे’ या कार्यक्रमात आरवली येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री व शिरोडा येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांच्याशी प्रा.गजानन मांद्रेकर यांनी मारलेल्या गप्पांमधून दळवींचे सामाजिक कार्य तसेच आरवली गावाविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा या संदर्भात दळवींच्या चाहत्यांना व त्यांच्या साहित्याच्या वाचकांना ज्ञात नसलेली माहिती मिळाली.


दळवी यांच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ साहित्य प्रेरणा कट्टा व खटखटे ग्रंथालयाने वर्षभर केलेल्या दळवींच्या बत्तीस पुस्तकांचे वाचन व चर्चेसंबंधीचा तसेच जिल्ह्यातील शाळा व अन्य ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा आढावा विनय सौदागर यांनी ‘दळवींचा साहित्य जागर’ या सत्रात घेतला.


दळवी यांच्या सुकन्या शुभांगी नेरूरकर, सोहळ्यास उपस्थित न राहू शकलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू,सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर,नामवंत साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांची मनोगतेही दृकश्राव्य फितीद्वारे या सोहळ्यात दाखविण्यात आली.


समारोपाच्या सत्रास प्रमुख वक्ते प्राचार्य अनिल सामंत,प्रमुख अतिथी प्राजक्त देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री,दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी, खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर,कार्यवाह सचिन गावडे व साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्रात प्राजक्त देशमुख यांनी दळवी यांच्या ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकामधील ‘जगी हा  खास वेड्यांचा पसारा’ या लेखाचे अभिवाचन केले.


गोव्यातील चित्रकार लक्ष्मण चारी यांनी रेखाटलेल्या जयवंत दळवी यांच्या पेन्सिल रेखाचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून स्थानिक गायक शेखर पणशीकर यांनी गायिलेल्या ‘मागे उभा मंगेश,पुढे उभा मंगेश…’ या गीताने सोहळ्याचा प्रारंभ झाला. 


दळवींचे पुतणे सचिन दळवी यांनी स्वागत केले,तर भाचे राजेश नाईक यांनी प्रास्ताविक केले.खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी शेवटी ऋणनिर्देश केला.


संपूर्ण सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन गोव्यातील साहित्यिक तथा यु-ट्यूबर सोनाली परब यांनी केले. सोहळ्यास जयवंत दळवींचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच गोवा व महाराष्ट्रातील दळवींच्या साहित्याचे चाहते उपस्थित होते.